01 December, 2021



 महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयात

युवकांसाठी सक्षम युवा शक्ती अभिमुखता कार्यक्रमाद्वारे जनजागृती

 

हिंगोली, दि.1 (जिमाका) : युनिसेफ (UNICEF) महाराष्ट्र एसबीसी 3 अंतर्गत बाल विवाह निर्मूलनासाठी सक्षम युवा शक्ती (SYS) मोहिमेचे उदघाट्न करण्यासाठी येथील शिवाजी महाविद्यालयात अभिमुखता  (Orientation) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हिंगोली जिल्ह्यातील बाल विवाह थांबविण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली , युनिसेफ़, एस बी सी 3 यांच्या मार्फत बाल विवाह निर्मूलनाची ही प्रक्रिया गावा-गावात पोहोचविण्यासाठी अग्रभागी कर्मचारी जसे अंगणवाडी पर्यवेक्षिका, एल एच व्ही आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यासाठी प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. त्यांच्यामार्फत गावातील अंगणवाडी सेविका, आशा व ग्राम बाल संरक्षण समित्यांना बाल विवाह थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून युनिसेफ़ आणि एस बी सी 3 च्या वतीने महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम युवा शक्ती या नावाने युवकांनी युवकांसाठीची बाल विवाह निर्मूलन मोहीम राबविण्यासाठी येथील शिवाजी महाविद्यालयात आज दिनांक 01 डिसेंबर,2021 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी अभिमुखता कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी पूजा यादव यांनी बाल विवाहाचे परिणाम व व्याप्ती समजावून सांगत हिंगोली जिल्ह्यातील बाल विवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सक्षम युवा शक्ती मोहिमेबाबत माहिती दिली. ॲड.अनुराधा पंडित यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा ह्या विषयी माहिती दिली. तर विकास लोणकर यांनी चाईल्ड लाईन 1098 ह्या हेल्पलाईन बाबत माहिती दिली. पुढील टप्प्यात सक्षम युवा शक्ती या मोहिमेअंतर्गत युवकांमार्फत सामाजिक माध्यम व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या युवक गटांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

प्राचार्य गायकवाड यांनी शिवाजी महाविद्यालयामार्फत बाल विवाह निर्मूलनासाठी जनजागृती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच मुलांनी सक्षम युवा शक्ती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे , कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित , समुपदेशक सचिन पठाडे, चाईल्ड लाईन सदस्य विकास लोणकर आणि, युनिसेफ़-एस बी सी 3 च्या कार्यक्रम प्रमुख पूजा यादव, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य  श्री.गायकवाड, उप प्राचार्य डॉ. क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजनेचे एनएसएस समन्वयक संगीता मुंढे, प्रा.बळीराम शिंदे, डॉ.सुनंदा भुसारे, डॉ.गवळी मनीषा, प्रा.सुनील कांबळे, प्रा.संजय चव्हाण, प्रा.आशिष इंगळे, प्रा.परसवाले, प्रा.नीलम काळे, प्रा.राऊत ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संगीता लोंढे यांनी केले.  

*****

No comments: