17 December, 2021

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत

एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन निविष्ठांच्या अनुदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 या योजनेअंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा, रब्बी ज्वारी, करडई इ. पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबींसाठी  पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, पायराईटस, होलोमाईट, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत लाभ देय आहे. 

सध्या रब्बी हंगामातील पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकल्पा बाहेरील बाबींसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : सुक्ष्म मुलद्रव्यासाठी प्रति हेक्टर 500 रुपयाच्या मर्यादेत किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते, जिप्सम प्रती हेक्टर 750 रुपये किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते, जैविक खते प्रती हेक्टर 300 रुपये किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते असे एकूण किंमतीच्या 50 टक्के  मर्यादेत देय आहे. एका  शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन : पिक संरक्षण औषधे प्रती हेक्टर 500 रुपये किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते, तणनाशके प्रती हेक्टर 500 रुपये किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते, जिप्सम, पायराईटस, होलोमाईट 750 रुपये प्रती हेक्टर, जैविक  खते 300 रुपये प्रती हेक्टर, पिक संरक्षण औषधे 500 रुपये प्रती हेक्टर, जैविक किड नियंत्रण 500 रुपये प्रती  हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत लाभ देय आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील ही कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि.28 फेब्रुवारी, 2022  पूर्वी सादर करावेत. त्यानुसार अनुज्ञेय  असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर  थेट लाभ  हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

*******

No comments: