मार्गदर्शक सूचनांचा
अवलंब करुन महापरिनिर्वाण दिन साजरा करावा
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 04 : मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या
संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कांही दिवसांमध्ये दक्षिण ऑफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन
ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे .
या ओमायक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये फार
मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे
सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे
अपरिहार्य झाले आहे.
वरील पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता यावर्षी सुध्दा
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिनांक 6 डिसेंबर, 2021 रोजी परमपूज्य डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिंगोली
जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दि. 6 डिसेंबर , 2021 रोजीचा
महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या
दृष्टिकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता
आयोजित करावयाचा आहे.
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन
महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 4 जून, 2021 चे
परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे दि. 11 ऑगस्ट, 2021 चे आदेश, तसेच दि. 24
सप्टेंबर, 2021 च्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे
तंतोतंत पालन करावे.
महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा गांभीर्याने पालन
करावयाचा असून परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त
करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड
संसर्गाच्या वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाणदिनी सर्व अनुयायांनी
काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा जिल्ह्यात मोठ्या
प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याने घरी राहूनच परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिवादन करावे. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने,
आंदोलने व मोर्चा काढू नयेत.
कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रजातीचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग,
आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे
काटेकोर पालन सर्व नागरिकांनी, संबंधितांनी तंतोतंत करावे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय
दंडसंहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस
अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी
न.प.-न.पं., तसेच संबंधित अधिकारी यांची असेल.
*******
No comments:
Post a Comment