हिंगोली जिल्ह्यात पंधरा दिवसात पाच बालविवाह रोखण्यात यश
हिंगोली (जिमाका), दि. 23 : - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली आणि चाईल्ड लाईन (1098) यांच्या समनव्याने जिल्ह्यात
पंधरा दिवसात पाच बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
सध्या देशात मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे व मुलाच्या
लग्नाचे वय हे 21 वर्ष आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.
बाल वयातच मुलीचे लग्न लाऊन देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे
शिक्षण देखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून
दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. यामुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण
दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात
आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती
चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात 15 दिवसात कळमनुरी तालुक्यातील
सिंदगी येथे 01, हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथे 01, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव
येथे 02 आणि वसमत तालुक्यातील पिंपळा (चौरे) येथे 01 असे एकूण 05 बालविवाह रोखण्यात
आले आहेत.
संबंधित बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण
अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी
संस्थाबाह्य जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक
सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व ग्रावसेवक तथा बालविवाह प्रतिबंध
अधिकारी आणि संबंधित गावातील ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य , अंगणवाडी सेविका यांच्या
मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबियाचे समुपदेशन करुन बालविवाह रोखण्यात जिल्हा
बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.
सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार
करता बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु मुलींच्या हक्कांचे संरक्षण करुन त्यांना
बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. जर आपल्या गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह
होत असल्यास तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन
(1098) या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी,
असे आवाहन बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
केले आहे. तर बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा
बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास
चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला
व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment