09 December, 2021



 संकल्पन कालावधी तीस वर्षे विचारात घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत

ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनाचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  संकल्पन कालावधी तीस वर्षे विचारात घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के उपस्थित होते.

या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या 15 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतच्या नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला आहेत. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव तीस वर्षाचा संकल्पन कालावधी विचारात घेऊन जल जीवन मिशन समितीकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर कराव्यात. ही सर्व कामे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन कायमस्वरुपी व भविष्यात पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी घेऊन करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.

   यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प संचालक, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

No comments: