11 December, 2021

 



हिंगोली जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे

जिल्हा न्यायाधीश एन.बी. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

  • राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील 253 प्रकरणे निकाली

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  येथील जिल्हा न्यायालय व त्याअंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व हिंगोली वकील संघाच्या वतीने आज जिल्हा न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एन. बी. शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. एस. एस. पतंगे हे होते. तर प्रमख पाहुणे जिल्हा न्यायाधीश-2 पी. व्ही. बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ह. जा. शेंडे, यु. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. निवघेकर, सरकारी वकील एन.एन.मुटकुळे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड हे होते.

यावेळी उद्घाटनपर भाषणात एन. बी. शिंदे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडी आधारे मिटवावेत, असे आवाहन केले. तर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. एस. पतंगे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावेत, असे आवाहन वकीलांना व पक्षकारांना केले.

या कार्यक्रमास वकील संघाचे सर्व सदस्य, बँकेचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार हजर होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे सचिव ॲड. डी. बी. खंदारे यांनी केले.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक, कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अपराध नियम 138 खालील प्रकरणे, दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी  1028 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 84 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच बँका व एमएसइडी कंपन्यांची 2201 वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. यापैकी 22 प्रकरणे निकाली निघालेली आहेत. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणात 2 कोटी 20 लाख 96 हजार 399 रुपये एवढी रक्कम तडजोडीआधारे वसूल झाली आहे.

या राष्ट्रीय लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणात पक्षकार तसेच हिंगोली वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील लोक अदालतीमध्ये 1951 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 173 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर 4205 वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 80 प्रकरणे निकाली निघाली आहेत. जिल्ह्यात प्रलंबित व वादपूर्व एकूण 253 प्रकरणात 3 कोटी 63 लाख 06 हजार 461 रुपये एवढी रक्कम तडजोडीआधारे वसूल झाली आहे. तालुकानिहाय निकाली निघालेल्या प्रलंबित व वादपूर्व प्रकरणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हिंगोली तालुक्यात प्रलंबित प्रकरणे-84 व वादपूर्व प्रकरणे-22,  वसमत तालुक्यात प्रलंबित प्रकरणे-33 व वादपूर्व प्रकरणे-22, सेनगाव तालुक्यात प्रलंबित प्रकरणे-14 व वादपूर्व प्रकरणे-08, कळमनुरी तालुक्यात प्रलंबित प्रकरणे-06 व वादपूर्व प्रकरणे-18, औंढा नागनाथ तालुक्यात प्रलंबित प्रकरणे-36 व वादपूर्व प्रकरणे-10 प्रकरणे तडजोडी आधारे निकाली निघाली आहेत, अशी माहिती परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

*****

No comments: