महिला व बालविकास कार्यालयात कामाच्या ठिकाणी
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाचा 8 वा वर्धापन दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 09
: कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी दि. 9 डिसेंबर, 2013 रोजी कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013
अंमलात आलेला आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्रालयाने या महत्वपूर्ण
कायद्याच्या अधिसूचनेचा आज दि. 9 डिसेंबर, 2021 रोजी 8 वा वर्धापन दिन साजरा
करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात
निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात
आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ॲड एन. एस. घुगे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून
स्थानिक तक्रार निवारण समितीच्या सदस्या ॲड. एस. एस. तांगडे, परिविक्षा अधिकारी
एस. एस. वाठोरे, विधी सल्लागार व्ही. एस. नागशेट्टीवार, जिल्हा बाल संरक्षण
अधिकारी एस. के. कोरडे, यु. एस. तांबे तसेच विविध कार्यालयातील महिला अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते ॲड. एन. एस. घुगे यांनी कामाच्या ठिकाणी
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 या
विषयावर विचार मांडताना अंतर्गत तक्रार समितीची रचना, सदस्यांची पात्रता, तक्रार
कशी व कोणाकडे करावी. तसेच कायद्याचा योग्यवेळी वापर करावा व त्याचा दुरुपयोग करु
नये, असे सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी या कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी करावी व प्रत्येक विभागात समित्या गठीत करण्याचे काम
प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या. भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार
दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांची मानसिकता बदलली पाहिजे. ज्यांच्यावर खरोखरच अन्याय
झाला आहे त्यांनी या कायद्याचा उपयोग घेऊन दाद मागावी, असे सांगितले.
भारतीय
संविधानानुसार महिलांना समानतेचा, सन्मानाने जगण्याचा तसेच कोणताही व्यापार, व्यवसाय
करण्याचा व लैंगिक छळापासून मुक्त् सुरक्षित कार्य वातावरणाचा अधिकार आहे.
अधिकाधिक महिलांना आर्थिक उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी
महिलांचा सन्मान राखण्याची तसेच सदर कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्याची जबाबदारी
प्रत्येक नियोक्त्यांची आहे.
*****
No comments:
Post a Comment