11 December, 2021

 

शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी

प्रत्येक गावात 13 व 14 डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

  • लस देण्यासाठी प्रत्येक गावात मतदान प्रक्रिये प्रमाणे लसीकरण पार्टी (पथक) स्थापन
  • लस न घेतलेल्या व्यक्तींना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फिरते पथक
  • पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांचे आवाहन

हिंगोली, (जिमाका) दि. 11 :  कोरोनाचा नवीन व्हेरीएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणेबाबत मा. विभागीय आयुक्त , औरंगाबाद व मा.जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दि.9 डिसेंबर रोजी सर्व कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी एका आठवड्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

शंभर टक्के लसीकरण  पूर्ण करण्यासाठी  प्रक्रियेची व्याप्ती वाढविणे आवश्यक अहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व मदतीने जनाजागृती करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुख यांच्या बैठका घेण्यात आल्या. लसीकरणाची  टक्केवारी वाढविण्यासाठी शहरी भागात प्रोत्साहन पर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी  शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन शंभर टक्के  लसीकरण पूर्ण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गुणगौरव करण्यात येणार आहे. लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने गर्दीच्या, वर्दळीच्या ठिकाणी जाऊन लस घेण्यासाठी जनाजागृती करणे व लस न घेतलेल्या व्यक्तींना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हिंगोली तालुक्यात शहरी भागासाठी दैनंदिन फिरते 04 पथक व सेनगाव तालुक्यासाठी 04 पथक स्थापन करण्यात आले आहेत.

दिनांक 13 डिसेंबर, 2021 व 14 डिसेंबर, 2021 रोजी लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी मतदान प्रक्रिये प्रमाणे प्रत्येक गावात जाऊन पात्र लाभार्थ्यांना लस देण्यासाठी पोलीस पार्टी प्रमाणे लसीकरण पार्टी (पथक) स्थापन करण्यात आले आहेत. लसीकरण प्रक्रियेत ग्राम पातळीवरील क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचारी  तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वस्त धान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांना लसीकरण मोहिमेत काम करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. या कामी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करण्यात आला असून लसीकरण पथक प्रत्येक गावात रवाना करण्यासाठी खाजगी वाहन अधिगृहीत करण्यातआलेली आहेत.

या मोहिमेची प्रसिध्दी करण्यासाठी दिनांक 11 डिसेंबर, 2021 रोजी प्रत्येक गावात शालेय विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली आहे. या प्रभात फेरीत गावातील स्तरावरील सर्व कर्मचारी  तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वस्त धान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांनी सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दिनांक 13 व 14 डिसेंबर,2021 रोजीच्या आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत लस न घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांनी शंभर टक्के लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले आहे.

*****

No comments: