महाराष्ट्रात ओमायक्रॉन
व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये
हिंगोली (जिमाका), दि. 04 : दक्षिण ऑफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दि. 24 नोव्हेंबर, 2021 रोजी
दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा
व्हेरिएंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिध्द झाले आहे. या नवीन विषाणू
प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून
त्याने कोणतेही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दि. 24 नोव्हेंबर, 2021 रोजी या
प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळले नाहीत. त्यामुळे या
रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड
केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी
जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटीव्ह आढळले
आहेत. याशिवाय आणखी निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या
जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून
या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही. तथापि डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला
आहे.
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या
देशातून आलेल्या सर्व 3839 प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर
देशांमधून आलेल्या 17,107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबर पासून आतापर्यंत 8 प्रवासी
कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय
राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय
पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने
भिती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा,
नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय
प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत
करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment