15 December, 2021

 

ग्राम बाल संरक्षण समिती मुलांच्या सुरक्षेसाठी एक प्रभावी यंत्रणा

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : परिसरातील लहान बालके किंवा निराधार मुले यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत आहे. ही समिती मुलांच्या सुरक्षेच्या व विकासाच्या दृष्टीने काम करणारी एक प्रभावी यंत्रणा आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती  कोरडे यांनी दिली.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम बाल संरक्षण समितीमधील सदस्य सचिव असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी श्रीमती कोरडे बोलत होत्या.

यावेळी बोलताना श्रीमती कोरडे म्हणाल्या, ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांचे हक्क व संरक्षण होणार असून बालकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती व अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची भूमिका महत्वाची  असल्याचे सांगून बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अन्वये बालकाच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत. अशा यंत्रणांची क्षमता बांधणी जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत चालू आहे. त्याअनुषंगाने ग्राम बाल संरक्षण समितीची कार्यशाळा सेनगाव येथे घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            या कार्यशाळेत बालकांचे अधिकार, बालकांविषयी असणारे कायदे व यंत्रणा, लैंगिक अत्याचारापासून  बालकांचे संरक्षण कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम, 2015 दत्तक विधान प्रक्रिया, बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 इ. विषयी  सविस्तर माहिती देण्यात आली.

            प्रशिक्षणा दरम्यान ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व, कामकाज व ग्राम बाल संरक्षण समितीच्या रचने विषयीची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे यांनी दिली. बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 विषयी माहिती समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाणखान यांनी  दिली. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक चित्रफितीचे प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट व बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी केले.

            या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*****

No comments: