07 December, 2021

कोविड-19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी

सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 07 :  कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ऑक्टोबर, 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26  नोव्हेंबर, 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाने Online Web Portal विकसित केले आहे. याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह अर्थसहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm  या वेबलिंकवर देखील ऑनलाईन अर्जाची लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वतः चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी अर्ज करता येईल.

केंद्र शासनाच्या आयसीएमआरवर ज्यांची कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराची आधारकार्ड प्रत (पीडीएफ/जेपीजी), मृत व्यक्तीची आधार कार्डाची प्रत (पीडीएफ/जेपीजी), जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा-1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी), अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक , अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची (Cancel Cheque) प्रत (पीडीएफ/जेपीजी), मृत्युच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी) उपलब्ध नसल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर वैद्यकीय कागदपत्रे (पीडीएफ/जेपीजी) अपलोड करणे आवश्यक आहे.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदाराने सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 च्या शासन निर्णयान्वये  मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली  तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे (जिल्हा शल्यचिकित्सक- सदस्य सचिव यांचेकडे) अपिल करण्याचे या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांसाठी वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे यासाठी त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC SPV) येथून अर्ज करु शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

***** 

No comments: