हिंगोली जिल्ह्यासाठी 1303 मेट्रिक टन युरिया खत
उपलब्ध होणार
शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास कृषि विभागाच्या तक्रार
निवारण कक्षाशी संपर्क साधावा
हिंगोली
(जिमाका), दि. 06 : जिल्ह्यात वसमत रेल्वे रॅक
पाँईटवर दि. 6 ऑगस्ट, 2023 रोजी 1303
मेट्रिक टन आरसीएफ युरिया उपलब्ध होणार आहे. त्याचे किरकोळ विक्रेतानिहाय वितरण
करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था व वाहनांची उपलब्धता यामुळे यादीमध्ये अंशत:
बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील सुमारे 150 रासायनिक खत
विक्री केंद्रावर युरिया खत उपलब्ध होणार असून त्यासोबत कोणत्याही इतर उत्पादनांची
लिंकींग नाही. त्यामुळे घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी युरिया सोबत शेतकऱ्यांना इतर
कोणत्याही उत्पादनाची लिंकीग, सक्तीने विक्री करु नये. तसे निदर्शनास आल्यास
संबंधित घाऊक व किरकोळ विक्रेत्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन
कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत युरिया खताचा केवळ 1303 मेट्रिक टन पुरवठा
होणार असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पुन:श्च 1300 मेट्रिक टन युरिया खताचा
पुरवठा होणार आहे. मर्यादित युरिया उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना
आवश्यकतेनुसार वाटप व्हावे यासाठी कृषि विभागाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या
पर्यवेक्षणाखाली युरिया खताचे वाटप करण्यात येणार असून त्याबाबत काही अडचण आल्यास
शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या तक्रार निवारण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे
आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment