07 August, 2023

 

जादा दराने युरिया विक्री केल्या प्रकरणी कृषि केंद्राचा परवाना रद्द तर

कापूस बियाणे विक्री प्रकरणी एक वर्षासाठी परवाना निलंबित

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि. 07 : सद्यस्थितीत जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी होत असून या धर्तीवर सेनगाव तालुक्यातील काही कृषि केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करुन जादा दराने विक्री केली जात असल्याची तक्रार कृषि विभागाच्या भरारी पथकास प्राप्त झाली होती. या अनुषंगाने सेनगाव तालुकास्तरीय भरारी पथकातील सेनगावचे तालुका कृषि अधिकारी एस. एस. वळकुंडे, पंचायत समितीचे कृषि अधिकारी पी. पी. गाडे यांनी जय हनुमान कृषि केंद्र हाताळा यांची तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटीची रितसर चौकशी करुन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी जय हनुमान कृषि केंद्र हाताळा यांचा खत विक्रीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. तसेच जादार दराने कापूस बियाणे विक्री संदर्भात वसमत येथील भरारी पथकास तक्रार प्राप्त झाल्यानंतर रितसर चौकशी करुन संतोष कृषि केंद्र वसमत यांचा बियाणे परवाना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार, अडचण असल्यास तात्काळ कृषि विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.

*****

No comments: