01 August, 2023

 गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : यावर्षी दि. 19 सप्टेंबर, 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पुरस्काराची निवड करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. दि. 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयात नमूद निकषांची पूर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमूना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 5 सप्टेंबर, 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयात नमूद निकषाची पूर्तता केलेल्या जिल्ह्यातून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस करण्यात येईल. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रथम 5 लाख रुपये, द्वितीय अडीच लाख रुपये आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून राज्यातील प्रत्येकी एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी दि. 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करुन मोठ्या प्रमाणात स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

No comments: