08 August, 2023

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अंतर्गत

9 ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयात घेतली जाईल शपथ

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश अंतर्गत संपूर्ण देशभर एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा सुरु होत असून केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभर याचे नियोजन केले गेले आहे. याअंतर्गत 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय, शासकीय महामंडळे आदी सर्व ठिकाणी सकाळी 10 वा. पंचप्रण शपथ घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

            भारतीय स्वातंत्र्याचे मूल्य डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जाणाऱ्या शपथेचा मजकूर शासनातर्फे निर्गमित केला आहे. आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करुअसा शपथेचा मजकूर सर्व कार्यालयांना पाठवून त्या-त्या विभाग प्रमुखांना आदेश दिलेले आहेत.

******

No comments: