07 August, 2023

 

महसूल सप्ताह सांगता समारंभ थाटात साजरा



 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हाधिकारी जितेंद्र  पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल दिन 1ऑगस्ट पासून सुरु झालेला महसूल सप्ताह आज दिनांक 7 ऑगस्ट, 2023 रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

या महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ कार्यक्रम येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात महूसल सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या विविध अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामाचा लेखाजोखा  सादर करण्यात आला, तसेच महसूल विभागात कार्यरत सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी यांच्या कामाचा गुणगौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्याचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे व आमदार संतोष बांगर यांनी उपस्थित महसूल विभागाच्या कामाची प्रशंसा केली. तसेच सेवा सदनमध्ये शिकणाऱ्या करण राऊत यांची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली असून त्यांना पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपये निधी संकलन करुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, इत्यादी अधिकारी व इतर लोकनेते हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड व सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वलं कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी , शिपाई , कोतवाल व पोलीस पाटील सहकुटुंब हजर होते.

******

No comments: