28 August, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष

 

विविध कार्यक्रमाद्वारे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील

आठवणींना उजाळा देण्याचे काम करावे

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीद लोकांची आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने जिल्हानिहाय कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी दररोज राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन तात्काळ सादर करावे. तसेच नियोजनानुसार दररोज विविध कार्यक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींना उजाळा देण्याचे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  यावेळी दिल्या.  

                मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 28 ऑगस्ट, 2023 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, माधव सलगर, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेश एडके, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त कळमनुरी तालुक्यातील दाती व वसमत तालुक्यातील वापटी येथे हुतात्मा स्मारक उभारणे, सध्या कार्यरत असलेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करणे, प्रत्येक गावातील भिंतीवर स्लोगने रंगवणे, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तसेच आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांला बोलावून त्यांचा सन्मान करावा. ज्येष्ठ नागरिंकाची आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. यासाठी सर्व विभागांनी आपण राबवित असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन सादर करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या .  

*******  

 

No comments: