अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये
हिंगोली (जिमाका), दि. 25
: शेजारच्या गुजरात राज्याकडून वजन काट्याचे
सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात , कररहीत स्वरुपात महाराष्ट्र राज्यात विकले जात
आहे. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक , दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होत
आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडत आहे, अशी तक्रार
प्राप्त झाली असल्याचे राज्याचे नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांनी कळविले आहे.
तसेच चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्याची
सुध्दा राज्यात कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या वजन काट्यांना राज्य
शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. हे वजन काटे अप्रमाणित असल्याने
ग्राहक हित हानी होत आहे. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टीकर
लावून त्यांची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूलावर परिणाम होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वजन काटे
उपयोगकर्त्यांनी अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये, असे
आवाहन उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, परभणी व हिंगोली जिल्हा यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment