10 August, 2023

 

कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात केली वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्याती सर्व वाहनचालकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी पार पडले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस निरीक्षक मुंढे व मोटार वाहन निरीक्षक नलिनी काळपांडे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वाढत्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. हे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांचे संतुलित आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, नियमित सवयी इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. या नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रुग्णालय यांचे हार्दिक अभिनंदन केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बोडेवार व नेत्र चिकित्सा अधिकारी आदर्श घनसावंत यांनी वाहन चालकांना भेडसावणाऱ्या त्वचा रोगाबाबत मार्गदर्शन केले. वाहनचालकानी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक नलिनी काळपांडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक विक्रांत बावणे, सुरज बाहेती यांनी उपस्थित वाहन चालक व नागरिकांना या शिबिरामध्ये रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक नलिनी काळपांडे व इतर सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी व जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

****

No comments: