07 August, 2023

 

औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथे महसूल सप्ताह अंतर्गत फेरफार अदालत संपन्न

भिकाजी नांगरे यांना चाळीस वर्षांनी भेटला न्याय

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




हिंगोली (जिमाका), दि. 07 : महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी व महसूल सप्ताह या उपक्रमांतर्गत 1 ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल मंत्री महोदयांनी महसूल सप्ताहामध्ये विविध गावामध्ये शासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा या आदिवासी बहूल गावांमध्ये आज दि. 7 ऑगस्ट रोजी आज येथे महसूल सप्ताहांतर्गत फेरफार अदालत हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, औंढ्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी श्री. गोरे, अव्वल कारकून शरद नाईकनवरे, इम्राण पठाण तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विविध विभागाचे एकूण 8 स्टॉल लावण्यात आले होते.

            मौजे असोला तर्फे लाख येथील रहिवाशी भिकाजी मरीबा नांगरे यांनी नोंदणीकृत खरेदी खताआधारे मौजे राजापूर येथील गट क्र. 104 मधील 1 हेक्टर 20 आर जमीन 40 वर्षापूर्वी विकत घेतली होती. परंतु त्याचा अमल सातबारावर झाला नसल्यामुळे एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही. परंतु सदर प्रकरण वसमतचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्या न्यायालयात सन 2023 मध्ये दाखल झाले. महसूल अभिलेखाची तपासणी व सविस्तर चौकशी करुन तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन हे प्रकरण निकाली काढले व भिकाजी मरीबा नांगरे यांना न्याय मिळवून दिला. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सातबारा, होल्डींग व फेरफार नक्कल देण्यात आली. तसेच यावेळी विविध पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

            यावेळी महसूल विभागांतर्गत लावण्यात आलेल्या स्टॉलवर जातीचा दाखला-25, नॉन क्रिमीलेअर-28, उत्पन्न-22, रहिवाशी प्रमाणपत्र 15, ईडब्ल्यूएस-10 व अधिवास 23 असे एकूण 123 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. फेरफार अदालत : 8-अ चे वाचन करुन वारस नोंदी-301, खरेदी फेरफार-2, इतर फेरफार-14, बोजा नोंद-9, बोजा कमी करणे-4, अपाक शेरा कमी करणे-5 असे एकूण 335 फेरफार करण्यात आले आहेत. निवडणूक विभागामार्फत नवीन मतदार नोंदणी -37, नाव वगळणी-7, नांव दुरुस्ती-8 असे एकूण 52 जणांना लाभ देण्यात आला आहे. पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका वाटप-5, नांव कमी करणे-2, नाव दुरुस्ती-4, नाव समाविष्ट-23 असे एकूण 35 लाभ देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 4 लाभार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे एकूण 1 लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. संजय गांधी योजना विभागामार्फत श्रावणबाळ योजनेतील 9 लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने लाभ देण्यात आला. कृषि विभागामार्फत ट्रॅक्टर वाटप-3, चक्की वाटप-1, तुषार संच 9, पेरणी यंत्र-4 असे एकूण 17 जणांना लाभ देण्यात आले आहे. तसेच पंचायत समिती विभागामार्फत शबरी घरकुल योजनेंतर्गत 125 लाभार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व आमदार संतोष बांगर यांनी थंब देवून 20 लाख 25 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.

            यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लता बोडखे, तलाठी, मंडळ अधिकारी श्रीमती पटवे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: