महाज्योतीतर्फे पीएचडी संशोधकांना
24 कोटी वितरीत !
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन
कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण
संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती
व विशेष मागास प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी पीएच.डी. अधिछात्रवृत्ती
योजना राबविण्यात येते. लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना
संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा या हेतूने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती
योजना राबविण्यात येते.
पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत
दिल्या जात असलेल्या अधिछात्रवृत्तीने विद्यार्थ्यांना निश्चिंत होऊन संशोधन कार्य
करता येते. संशोधनासाठी लागत असलेले संदर्भ ग्रंथ घेता येतात. अहवाल तयार करण्यासाठी
प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात. आज
या अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊन विद्यार्थी संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यापीठात
शिकवत आहे. आपले आणि आपल्या येणार्या पिढीचे करिअर घडावीत आहे.
वर्ष 2021 मधे निवड झालेल्या 648 विद्यार्थ्यांना
जुलै ते डिसेंबर या कालावधीत तसेच वर्ष 2022 मधे निवड झालेल्या 1236 विद्यार्थ्यांना
नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत एकूण चोवीस कोटी सतरा लक्ष सत्यांसी हजार सातशे एकोनपन्नास
रुपये (24,17,87,749) इतकी अधिछात्रवृत्ती देण्यात आलेले आहे. महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना
अधिछात्रवृत्ती सोबत घारभाडे व आकस्मिक निधी देखील देण्यात येतो.
यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील
पदव्युत्तर पदवी परीक्षा पास असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेच्या
शर्तीनुसार नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील
अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतात.
मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास
बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी पीएच.डी. अधिछात्रवृत्ती
योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संशोधन कार्यात करिअर घडविण्याचे आवाहन
केले आहे.
*******
No comments:
Post a Comment