07 August, 2023

 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

वाहनचालकांनी नेत्र व आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे

सहायक प्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक दिनांक 03 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी जिल्हाधिकारी यांना हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या मोटार सायकल व मोटार कार वाहन चालकाचे, प्रवाशाचे अपघात हे जास्त प्रमाणात हेल्मेट व सिटबेल्ट न वापरल्यामुळे मृत्युचे प्रमाण अधिक आहे अशी बाब निर्देशनास आणून दिली. त्या अनुषंगाने श्री. अनंता जोशी यांनी हेल्मेट सक्ती याबाबत यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्ह्यातील विविध आस्थापनामधील कर्मचारी व अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयात हेल्मट शिवाय परवानगी देण्यात येणार नाही. त्या अनुषगाने कार्यालयात मा. परिवहन आयुक्त, मुंबई यांचे परिपत्रकाची प्रत देवून त्याबाबत सर्वाचे समुपदेशन करण्यात आले. यापुढे बिना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध सक्तीने कारवाई करणे गरजेचे आहे, असेही निर्देशनास आणून दिले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, विविध आस्थापना मधील सर्व कर्मचारी, अधिकारी व कार्यालयाला भेट देण्याऱ्या दुचाकी वाहनचालकानी हेल्मेट वापरुनच वाहन चालविण्यात यावे, असे आवाहन केले आहे. जे कर्मचारी, अधिकारी व कार्यालयाला भेट देणारे वाहनधारक दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणार नाहीत अशा वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे परिवहन विभाग व पोलीस विभाग यांना निर्देश दिले आहेत. तसेच या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील विविध अपघाताचे बॅल्क स्पॉटला व जिथे अपघात होऊ शकतात असे संवेदनशील स्पॉटस यांचा आढावा घेण्यात आला. या स्पॉटवर अपघात न होण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविध उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले आहेत.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक, प्रवासी वाहतुक करणारे वाहन चालक, एसटीचे वाहनचालक तसेच मालवाहतूक करणारे सर्व वाहनचालकाचे नेत्रशिबीर व आरोग्य शिबीराचे दिनांक 08 ऑगस्ट, 2023 ते दिनांक 11 ऑगस्ट, 2023 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयामध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली आहे. या शिबीरामध्ये वाहनचालकास आवश्यकता भासल्यास मोफत चष्मा पुरविण्यात येणार असून वाहनचालकांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वाहनचालकाने या नेत्र शिबीर व आरोग्य शिवारास उपस्थित राहून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे येवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, शिक्षणधिकारी संदीपकुमार सोनटक्के, पोलीस निरीक्षक यु. एम. शेख, महामार्ग पोलीस, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

*****

No comments: