15 October, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हिंगोलीत 150 विद्यार्थ्यांची २ डी-इको तपासणी ३० हृदयरुग्ण विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी केआयएमएस ठाणे येथे संदर्भ

 


        हिंगोली, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आणि सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून हृदयरोगाचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे १५ ऑक्टोबर रोजी विशेष २डी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्यांतील १५५ संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांपैकी १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३० विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

        या शिबिरासाठी ठाणे येथील केआयएमएस (KIMS) रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया कारापूरकर आणि त्यांच्या पथकाने तपासणी केली. संदर्भित विद्यार्थ्यांवर महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केआयएमएस रुग्णालय, ठाणे येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना वेळेत निदान आणि उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

        मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अधिष्ठाता डॉ. राजहर्ष हनुमंते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. सचिन बोधगिरे, डॉ. स्नेहल नगरे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी आणि रुग्णालयातील परिचारिकांनी परिश्रम घेतले.

        हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू बालकांना या कार्यक्रमांतर्गत यापूर्वीही उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला आहे. उपचारांमुळे लाभ झालेल्या बालकांच्या पालकांनी आरबीएसकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार २डी-इको तपासणी करून आजाराचे लवकर निदान व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.

No comments: