15 October, 2026

शिवाजी महाविद्यालयात जागर आरोग्याचा - मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रम

        हिंगोली, दि. १५ ऑक्टोबर  (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली यांच्यावतीने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्ष हिंगोली यांच्या समन्वयाने शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.     विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यभर ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’जागर आरोग्याचा हा  उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी मानसिक आरोग्य, परीक्षेचा ताण, चिंता व नैराश्य, व्यसनांचे दुष्परिणाम, संतुलित आहार, व्यायाम, झोप तसेच लैंगिक व प्रजनन आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले.

        कार्यक्रमात सदाशिव तनपुरे, डॉ. शाम गबारे व दत्तराज मगर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्य राखण्याची शपथ घेतली. या उपक्रमात एकूण 67 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राद्यापक उपस्थित होते.

No comments: