वाचनसंस्कृती ही समृद्ध समाजाचा पाया- ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर
हिंगोली, दि. १५ (जिमाका) : लहान वयातच मुलांना चांगल्या पुस्तकांची ओळख करून दिल्यास उद्याचे ते सुजाण नागरिक घडण्यास मदत होईल. वाचनसंस्कृती ही समृद्ध समाजाचा पाया असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच यावेळी सेवा संकल्प अभियानात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी प्राचार्य सी. के. देशपांडे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, जी. पी. मुपकलवार आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांच्यासह शिक्षक, शालेय विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ग्रंथालयाची पाहणी घडवून आणण्यात आली. यावेळी ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, महिला व बाल विभाग, संदर्भग्रंथ विभाग तसेच ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची गोडी जोपासावी. पुस्तके हीच आपली खरी मित्र आणि मार्गदर्शक असून, वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा विकास होतो, असे मत जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ. कलाम यांचा वाचनाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालय विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसह सर्व वाचनप्रेमींनी ग्रंथालयाचे सभासद होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमात सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय आणि सत्यनारायण विद्या मंदिर येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सी. के. देशपांडे, खंडेराव सरनाईक आणि जी. पी. मुपकलवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान एक तास अवांतर वाचन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले.


No comments:
Post a Comment