15 October, 2026

मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी एनएसपी पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन ;ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावेत

         हिंगोली, दि. 15 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (डीएनटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (एनएसपी) भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी एनएसपी पोर्टलवर अर्ज

        ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा पात्र मुला-मुलींनी एनएसपी पोर्टलवर अर्ज करावेत. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या नववी व दहावीतील मुलींचे अर्ज सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर भरावेत. तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत.

            माध्यमिक शाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठीची गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुंबईतील विद्यार्थ्यांसाठीची गुणवंत शिष्यवृत्ती, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क भरण्याची योजना तसेच सैनिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठीचा देखभाल भत्ता या चार योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरच भरावेत.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज एनएसपीवर

        ‘पीएम यशस्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इतर मागासवर्गीय (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज केवळ एनएसपी पोर्टलवर स्वीकारले जाणार आहेत. या चार योजनांसाठी नवीन अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी एनएसपी पोर्टलवरच अर्ज करावेत.

महाडीबीटीवरील सात योजनांचे अर्ज पूर्ववत सुरू

        व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या व व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, इयत्ता अकरावी व बारावीतील व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, इमाव, विमाप व विजाभज विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, तसेच ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीच्या योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरावेत. याशिवाय संबंधित प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क परतफेडीच्या योजनेचे अर्जही महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत.

        सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत भरले जातील, याची दक्षता संबंधित शाळा व महाविद्यालयांनी घ्यावी. या योजनांसाठी संबंधित शाळेतील/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यत आहे. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित योजना लागू असल्याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून करून घ्यावी. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याने अर्जाची ऑनलाइन पडताळणी केली आहे किंवा नाही, याचीही खात्री विद्यार्थ्यांनी करावी. अर्ज प्रक्रियेत विलंब झाल्यास संबंधित शाळा व महाविद्यालये जबाबदार राहतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

No comments: