हिंगोली, दि. १५ (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवा पिढीचे प्रेरणास्थान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अग्निपंख’ या पुस्तकातील निवडक भागांचे वाचन श्रीमती आम्रपाली चोरमारे, वहिदा काजी आणि मंकरणा जाधव यांनी केले. या वाचनातून डॉ. कलाम यांचा संघर्षमय जीवनप्रवास, त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान यांना उजाळा देण्यात आला.
यावेळी महसूल सहाय्यक विजय घ्यार यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा अंगीकार करून वाचनाची आवड जोपासणे, ज्ञानाची कक्षा रुंदावणे आणि जीवनात ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हा वाचन प्रेरणा दिनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

No comments:
Post a Comment