04 July, 2017

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

हिंगोली, दि. 4 :  समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 यांनी या गटास पोलीस कर्मचारी यांचे ड्रिल, गॅस ॲम्युनेशन, 7.62 एमएम एकेएम, एलएमजी, 5.56 एमएम इंसास, एलएमजी, स्टेस मॅनेजमेंट सत्र क्र. 11 व 12 चे वार्षिक गोळीबार सराव दि. 3, 4, 5, 15, 29 जुलै, 2017 व दि. 5, 12, 19, 26, 30 ऑगस्ट, 2017 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उपलब्ध असलेले गोळीबार सरावाकरिता मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी केली होती.  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत असून सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                                                ***** 
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

हिंगोली, दि. 4 :  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 03 जुलै, 2017 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 17 जुलै, 2017 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
आगामी काळात धरणे, मोर्चे, रस्तारोको, आंदोलनाची शक्यता तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांना वीज जोडणी अशा प्रश्नामुळे या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 03 जुलै, 2017 ते दि. 17 जुलै, 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

                                                                                *****   
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.05 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 4 :  जिल्ह्यात मंगळवार दिनांक 04 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 5.27 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  1.05  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 187.87 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 21.10 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  मंगळवार दि. 04 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 2.43 (249.70), वसमत - 0.00 (138.97), कळमनुरी - 1.17 (113.51), औंढा नागनाथ - 0.00  (209.40) , सेनगांव - 1.67 (227.77). आज  अखेर  पावसाची सरासरी 187.87 नोंद झाली.

***** 

03 July, 2017

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती
 यांचा भेटी व पाहणीचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम

हिंगोली, दि. 3 :  महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा भेटी व पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम दि. 06 व 07 जुलै, 2017 रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व वन (दुष्काळ निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना व गौण खनिज) विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि गृह (राज्य उत्पादन शुल्क) विभाग या विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्प/कामांना भेटी व पाहणीबाबत दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असणार आहे.
            गुरूवार, दि. 06 जुलै, 2017 रोजी दुपारी 2.00 ते 3.30 वाजता परभणीहून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व वन (दुष्काळ निवारणार्थ करण्यात येणार उपाययोजना व गौण खनिज) विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क) विभाग या विभागांच्या प्रकल्प/कामे/योजनांकडे भेट व पाहणी. रात्री शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम राहील.
            शुक्रवार, दि. 07 जुलै, 2017 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 वाजता हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व वन (दुष्काळ निवारणार्थ करण्यात येणार उपाययोजना व गौण खनिज) विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि गृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क) विभाग या उर्वरित विभागांच्या प्रकल्प/कामे/योजनांकडे भेट व पाहणी. दुपारी 1.00 ते 2.00 वाजता राखीव. दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 वाजता समितीने हिंगोली जिल्ह्यात दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबींसंदर्भात तसेच लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती.

*****
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.14 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 3 :  जिल्ह्यात सोमवार दिनांक 03 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 20.71 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  4.14  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 186.82 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 20.98 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  सोमवार दि. 03 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 7.43 (247.27), वसमत - 5.86 (138.97), कळमनुरी - 1.00 (112.34), औंढा नागनाथ - 2.25  (209.40) , सेनगांव - 4.17 (226.10). आज  अखेर  पावसाची सरासरी 186.82 नोंद झाली.

***** 
वस्तू व सेवा कर कायद्याविषयी मार्गदर्शन
          हिंगोली, दि. 3 : प्रस्तूत वस्तू व सेवाकर कायद्याचे स्वागत करण्यासाठी दि. 1 जुलै, 2017 रोजी वस्तू व सेवाकर कार्यालय हिंगोली येथे कार्यक्रम संपन्न झाला.
                याप्रसंगी सहाय्यक राज्य कर आयुक्त निलेश शेवाळकर यांनी जीएसटी बद्दल व्यापाऱ्यांच्या मनातील भीती काढून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी रमेशचंद्र बगडीया, अशोक डुब्बेवार व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश थोटे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. तपासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीएसटी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
                1 जुलै, 2017 पासून संपुर्ण देशात वस्तू व सेवाकर कायदा लागु झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अप्रत्यक्ष कर प्रणाली मधील हा सर्वात मोठा व सर्वसमावेशक बदल आहे. जगभरात अंदाजे 165 देशात ही कर प्रणाली राबविली जाते. भारतासारख्या लोकशाही सरकार असलेल्या संघीय देशामध्ये या कर प्रणाली आमलात आणणे हे अत्यंत आव्हानात्मक होते कितेक वर्षापासून केंद्र व सर्व राज्याच्या स्तरावर ही कर प्रणाली अंमलात आणण्याचे प्रयत्न चालु होते. केंद्र व राज्यामधील विविध स्तरावरील व्यक्तीच्या अथक परिश्रमानंतर ही कर प्रणाली लागु करणे शक्य झाले आहे. 1 जुलै हा दिवस अप्रत्यक्ष कराशी संबंधीत भागधारक तसेच सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे.
                देशातील अप्रत्यक्ष कर प्रणाली मध्ये अमुलाग्र बदल करणारी ही वस्तू व सेवा कर प्रणाली आहे. सदर कर प्रणाली ही राष्ट्रीय सकल उत्पन्नात वृध्दी करणारी आहे. संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराची एकच पारदर्शक पध्दत हा वस्तू व सेवा कर प्रणालीचा मुळ गाभा आहे. उद्योजक व व्यापाऱ्यासाठी ही कर पध्दत सोपी असून त्यातील तरतुदीमुळे वस्तू व सेवांच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना त्यांचा फायदा होईल. सदर कर पधदतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील (पूर्वीचा विक्रीकर विभाग) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जवळपास 425 ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच व्यापाऱ्यांना नोंदणी, विवरणपत्र दाखल करणे इत्यादी बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत.
                सर्व करदात्यांना आवाहन करण्यात येते की, या कर प्रणालीबाबत दडपण घेऊ नये. कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतूदी प्रक्रिया यामध्ये अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील कापड उद्योगबाबतीत व्यापाऱ्याप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत. त्यांना दि. 30 जुलै, 2017 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. शासनाने सर्व करदात्यांच्या खऱ्या अडचणी एकत्रीत करून वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात, त्याबाबत विचारविनिमय करुन कार्यवाही केली जाईल. ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन सुध्दा ऑनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने जीएसटीआर 3 बी या नमुन्यात विवरण पत्र तयार करण्यासाठी युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागांतील उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
                या दिवसाचे औचित्य साधून विक्रीकर भवन या कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर भवन असे बदलण्यात येत आहे.

*****

01 July, 2017

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
            हिंगोली, दि. 1 : राज्याचे सामाजिक  न्याय  आणि विशेष सहाय्य, मदत   पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक  विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे  पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजीत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.
            यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी खरिप हंगाम, कर्ज वितरण , पीक पेरणी, खत व बियाणांची स्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्ज पुनर्गठन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, डीपीडीसी अंतर्गतची विकास कामे, कृषिपंप वीज जोडणी या विषयाचा आढावा घेतला. तसेच पोलीस, जलयूक्त शिवार योजना, नगर परिषद-नगर पंचायत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अग्रणी बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक बांधकाम  आदी विभागाचा ही आढावा पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी घेतला. जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरण तसेच सर्व विभागांनी आपआपसात समन्वय राखून कामे करावीत.
            यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पूरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.


****