06 October, 2020

सर्व आस्थापनांनी सप्टेंबर अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र 31 ऑक्टोबर पूर्वी भरण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 6 :  जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी माहे ऑक्टोबर 2020 ची मासिक वेतन देयके दाखल करताना माहे सप्टेंबर 2020 अखेरचे ई आर -1 त्रैमासिक विवरणपत्र जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत. त्यासाठी ईआर-1 हे विवरणपत्र भरावयाची मुदत दि. 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन भरुन त्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र काढून घ्यावेत.

तसेच सर्व कार्यालयांनी आपले ईमेल पत्ता, फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक अद्ययावत करुन घ्यावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

0000

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिध्द, हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, दि. 5 : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 साठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची प्रारुप यादी व सूचनापत्र (मराठी व इंग्रजी) जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये यांच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्ह्याच्या  https://hingoli.nic.in या संकेतस्थळावर दि. 06 आक्टोबर,2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

        प्रसिध्द करण्यात आलेली 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक- 2020 च्या मतदान केंद्राची प्रारुप यादी उक्त कार्यालये तसेच संकेतस्थळावर अवलोकनासाठी उपलब्ध असेल. 

       या यादीबाबत काही हरकती व सूचना असतील तर अशा सूचना व हरकती यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसापर्यंत म्हणजेच दि. 13 आक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी  गोविंद रणवीरकर यांनी प्रसिद्धी पत्रान्वये  केले आहे.   

*****

05 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 21 रुग्ण ; तर 24 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 243 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

        हिंगोली,दि. 5 : जिल्ह्यात 21 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 09 व्यक्ती, सेनगाव परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 03 व्यक्ती व वसमत परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 07 व्यक्ती असे एकूण 21 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 24 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 24 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 08 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 32 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 759 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 476 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 243 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 40 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****

केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरु, § मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन § 1 ऑक्टोबर पासून मूग, उडीद खरेदी सुरु

 

            हिंगोली,दि. 5 : केंद्र शासनाचे आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये मूग, उडीद खरेदी करण्यासाठी दि. 15 सप्टेंबर, 2020 पासून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. तर        दि. 1 ऑक्टोबर, 2020 पासून मूग, उडीद खरेदी सुरु झालेली आहे. तसेच सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर, 2020 पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे.

मूग, उडीद, सोयाबीन नोंदणी व खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून त्या ठिकाणी नोंदणी व खरेदी सुरु करण्यात आली आहे.  निश्चित करण्यात आलेल्या खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संस्था, हिंगोली या केंद्राचा पत्ता जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना, हिंगोली हे असून केंद्र चालकाचे नाव अमोल काकडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8788487588 असा आहे. कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर या केंद्राचा पत्ता कळमनुरी हे असून केंद्र चालकाचे नाव महेंद्र माने असे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9736449383 असा आहे. औंढा (ना.) तालुका खरेदी विक्री संघ मर्या या केंद्राचे ठिकाण जवळा बाजार हे असून केंद्र चालकाचे नाव कृष्णा हरणे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9175586758 असा आहे. वसमत तालुका सह.खरेदी विक्री संघ मर्या या केंद्राचा पत्ता मार्केट कमिटी, वसमत असा असून केंद्र चालकाचे नाव सागर इंगोले हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8390995294 असा आहे. श्री. संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था या केंद्राचा पत्ता तोष्णीवाल कॉलेजच्या समोर, साई जिनींग, हिंगोली रोड, सेनगाव असा असून केंद्र चालकाचे नाव संदीप काकडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7758040050 असा आहे. विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था या केंद्राचा पत्ता साखरा ता. सेनगाव जि. हिंगोली असा असून केंद्र चालकाचे नाव माधव गाडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9423737672 असा आहे.

            जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी खरी हंगाम 2020-21 मधील पिक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील  व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली यांनी केले आहे.

****

02 October, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन

 



हिंगोली, दि. 2 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसिलदार श्री. जोशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

 

01 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 18 रुग्ण ; तर 21 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 319 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 1: जिल्ह्यात 18 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परीसरात 14 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे वसमत परिसरात 03 व्यक्ती असे एकूण 18 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 21 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 24 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 9 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 33 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 697 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 341 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 319 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 37 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

*****

नवरात्रोत्सव सणानिमित्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांचे आदेश

 हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादूर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता  दि. 17 ऑक्टोबर, 2020 पासून साजरा करण्यात येत असलेला नवरात्रोत्सव या सणासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळानी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार यथोचित परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपरिषद , नगर पंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचें  मंडप उभारण्यात यावेत. सार्वजनिक रस्ता अथवा सार्वजनिक जागेवर मंडप उभारण्यात येऊ नये. या वर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी. जास्तीत जास्त चार व्यक्तींना मुर्तींची स्थापना व विसर्जन करता येईल. देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनात चार पेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाहीत. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रोत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती  देण्यात यावी. तसेच ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये. देवीच्या मूर्तीची पूजा  करणाऱ्या पुजाऱ्यांनी, मंडळातील सदस्यांनी सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींचे पालन करुन पूजा करावी. पुजाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पूजा करण्यास परवानगी राहणार नाही .

आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना चार पेक्षा जास्त लोक असू नयेत. याचे भाविकांसाठी  फेसबूक लाईव्ह, लोकल केबल किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून प्रक्षेपण करावे. तसेच पर्यावरण नियंत्रण मंडळाने किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्याचा वापर करुन  ध्वनी किंवा हवेचे प्रदूषण करण्यास प्रतिबंध  असेल.  मंदीर परिसर, नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी परवानगी राहणार नाही. देवीच्या दर्शनासाठी मंडळानी ऑनलाईन  प्रक्षेपण, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध  करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था  करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी  शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग), स्वच्छतेचे नियम, हँडवॉश व सॅनिटायझेशनची सुविधा, सर्वासाठी मास्कचा वापर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.  देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक  पध्दतीतील  विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले  आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण गावातील , नगरातील, इमारतीतील  सर्व घरगुती  देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. नगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. मंडपात एकावेळी चार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीना घरगुती नवरात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी असेल. परंतु सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास मनाई असेल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी  नवरात्रोत्सव कालावधीत शेजारील  तसेच बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा  रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम  पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा  असावा. याकरिता रावण दहनाचा पुतळा चार फुटाच्या  मर्यादेत असावा. रावण दहनासाठी आवश्यक  व्यक्तीच (केवळ समिती मधील सदस्य) कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. प्रेक्षकांना फेसबूक व इतर समाज  माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया  संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार  शिक्षेस पात्र राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी , कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

 

*****