02 August, 2023

 

नागरिकांनी महसूल सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.

             - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताहनिमित्त युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 02 ऑगस्ट, 2023 रोजी तहसील कार्यालय, हिंगोली येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय दैने, अपर जिल्हाधिकारी हिंगोली खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

                                यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देवून संबंधित विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली, प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र, लाभांचे वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच विविध लाभार्थ्यांच्या समस्या ऐकून त्या निवारण करण्याच्या देखील संबंधितांना सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

तहसील प्रशासनातर्फे सर्व मान्यवर व लाभार्थी यांचे रोपटे भेट देवून स्वागत करण्यात आले. दि.01 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला असून दि.03 ऑगस्ट, 2023 रोजी 'युवा संवाद' हा कार्यक्रम आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे दुपारी 1.002 वाजता आयोजित केलेला आहे. युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नवनाथ वगवाड तहसीलदार हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केलेले आहे.

 

*****

 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी  अंतिम दिनांक  03 ऑगस्ट

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतक-यांसाठी वरदान ठरत आहे. कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्तीवर शेती करणा-या शेतक-यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै,2023 ही होती, ती आता केंद्र शासनाने 03 ऑगस्ट, 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

दिनांक 01 ऑगस्ट, 2023 अखेर हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख 5 हजार 494 शेतकरी यांनी 3 लाख 20 हजार 82 क्षेत्रावर विमा उतरविला आहे. तालुका निहाय शेतकरी संख्या पाहता औंढा नागनाथ 99 हजार 971, वसमत 1 लाख 14 हजार 469, हिंगोली-91 हजार 071, कळमनुरी-86 हजार 823 आणि सेनगांव 1 लाख 13 हजार 160 या प्रमाणे विमा उतरविला आहे. विमा भरण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 असून राहिलेल्या शेतक-यांनी सामुहिक सुविधा केंद्र (CSC सेंटर) द्वारे 01 रुपयात विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

तसेच मागील काही दिवसात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे अथवा मार्गदर्शक सुचनेतील अन्य कारणामुळे ज्या विमा काढलेल्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी निवड करण्यात आलेली विमा कंपनी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्याकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्वरीत इंटिमेशन सादर करायचे आहे. त्यासाठी पत्ता:डी-301 तीसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग,भांडुप (पश्चिम), मुंबई-400078 असा असून संपर्कासाठी टोल फ्री क्र. 18002660700 व ई-मेल-pmfby.maharashtra.@hdfcergo.com असा आहे. सदरील विमा कंपनीने जिल्ह्यामध्ये कार्यालय देखील स्थापन केले आहे. त्यांच्या कंपनीप्रतिनिधींची माहिती खालील प्रमाणे आहे.

हिंगोली (जिल्हा) यासाठी दिपक बेतिवार (मो. 9911114171) व संतोष सरकटे (मो.7875651137), हिंगोली (तालुका)-श्रीधर बोरकर (मो.8390208459), सेनगाव- संतोष तायडे (8975770177) व संतोष भाकरे (7709670967), वसमत- सगीर नाईक (8329169286) व जाहिद हुसेन (8087889331), औंढा नागनाथ- पवन गायकवाड (8308889773) व रत्नदीप भालेराव (8483802619), कळमनुरी- संतोष बकरे (9158688422) व रवी वाघमारे (9860872329) याप्रमाणे कंपनी प्रतिनिधी आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

*****

 

वनहक्क जमिनीधारक शेतकऱ्यांनी

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना वनजमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे व सदर जमिनीची नोंद वनखंड क्रमांकाच्या स्वरुपात आहे, आणि ज्या वनजमिनीचे 7/12 उतारे जारी झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या नावे वैयक्तिक 7/12 उतारे निघत नाही. अश्या जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी  त्यांना प्राप्त झालेल्या टायटल्सच्या आधारावर ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी पात्र होतात.

 त्यामुळे जिल्ह्यातील अश्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जिथे आपले बचत खाते असेल त्या बँकेत जाऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपला पिक विमा विहित कालावधीत उतरवून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी केले आहे. तसेच सर्व बँकांनी अश्या शेतकऱ्यांचे पिक विमे तात्काळ उतरवुन घ्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

 

*****

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मजूरांनी

 पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एनपीसीआय व्हेरीफिकेशनसह आधार लिंक करुन करुन घ्यावेत


हिंगोली (जिमाका), दि. 02  :  राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, 2005 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेचे मुख्य ध्येय ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवसाच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरुपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे आहे. तसेच ही योजना ग्रामीण शेतकरी/शेतमजूरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करुन रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करते.

ग्रामीण भागात राहणाऱ्या मग्रारोहयो नोंदणीकृत कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्य ज्यांचे वय जॉबकार्डमध्ये आहे त्यांना ग्रामपंचायतीमधील योजनेंतर्गत अकुशल कामासाठी काम मागणी केल्याच्या पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम प्रदान केले जाते. त्यांच्या कामाची मजूरी ही त्यांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये NPCI द्वारे प्रदान केली जाते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजूरांचे बँक खाते हे तालुका स्तरावरील तसेच ग्रामीण स्तरावरील पीडीसीसी बँक, को. ऑपरेटीव बँकेत एका पेक्षा जास्त बँकेत खाते असणे तसेच सदर बँक खाते NPCI व्हेरीफिकेशन सह नसल्याने मजुरांची मजूरी व मग्रारोहयो अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे कुशल देयके रिजेक्शन (Rejection)  मध्ये येत आहेत. त्यामुळे सदरचे देयके प्रलंबित राहत असून मजूरांना वेळेत मजूरीची अदायगी होत नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मजूरांना तसेच लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी  आपल्या जवळ असलेल्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये NPCI व्हेरीफिकेशन सह 200 रुपये (अक्षरी दोनशे रुपये मात्र ) माफक दरामध्ये आधार लिंक करुन बँक खाते चालू करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

 

 

हेल्मेट युक्त कार्यालय अपघात मुक्त कार्यालय अभियानाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ

  

हिंगोली (जिमाका), दि. 02 : राज्य परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना इत्यादीमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हेल्मेट युक्त कार्यालय अपघात मुक्त कार्यालय या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या संख्येत व मरण पावलेल्या नागरिकाच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी लक्षणीय वाढ झालेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालय तसेच खाजगी संस्था, कंपनी येथील आस्थापनेवरील दुचाकी वापरणारे अधिकारी व कर्मचारी, सर्व कॉलेज मधील विद्यार्थी, सामान्य नागरिक जे दुचाकीवरुन कार्यालयास भेट देतात. यांना हेल्मेट परिधान करुनच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा कार्यशाळा यापुढे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते सुरक्षेचे विविध नियम, हेल्मेट व सिट बेल्ट यांचा कसोशीने वापर इत्यादीवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सोमवार, दि. 31 जुलै पासून हेल्मेट परिधान न करता विविध कार्यालयात दुचाकी घेऊन जाणाऱ्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरुध्द कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत.

या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी रस्ते अपघातामध्ये हेल्मेट न घालता प्रवास केल्यामुळे झालेली हानी या बाबतचा वैयक्तीक अनुभव कथन करुन दुचाकी चालविल्यामुळे अत्यंत जवळच्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले असल्याचे अनुभव त्यांनी कथन केले.  

******

01 August, 2023

 

सामाजिक न्याय विभाग हिंगोली येथे साहित्यरत्न

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्सहात साजरी 



हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभाग हिंगोली येथे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त, शिवानंद मिनगीरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी व कार्यालय अधीक्षक सत्यजीत नटवे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी हिंगोली जिल्हयातील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणा-या 04-मुलींचे शासकिय वसतिगृहे, 04-मुलांचे शासकिय वसतिगृहे व 01-मुलींची शासकिय निवासीशाळा तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 20 विजाभज आश्रमशाळेत  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

*****

 

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग आहे. महसूल विभाग हा लोकांशी नाळ जोडलेला विभाग आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ह्या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

महसूल दिनानिमित्त येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, संतोष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपविभागीय अधिकारी  उमाकांत पारधी, सचिन खल्लाळ, सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, महसूल  विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकोप्याने काम केल्यामुळेच आपला हिंगोली जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे. आपले हे स्थान कायम ठेवण्यासाठी यापुढेही आपले सहकार्य आवश्यक आहे. आपला उत्साह, काम करण्याची ताकद, मनापासून काम करण्याची पध्दत यामुळे आपल्या जिल्ह्याचे स्थान कायम आहे. आपली प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्तीमुळे हिंगोली जिल्हा मराठवाड्यात चांगले काम करत आहे. यावर्षी शासनाने महसूल सप्ताह साजरा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या महसूल सप्ताहात नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्याचे काम प्राधान्याने सोडवून जतनेशी नाळ जोडण्याचे काम करावे. या अभियानात एक हात मदतीचा या उपक्रमात जनतेमध्ये जाऊन त्यांच्या संवेदना ऐकूण त्यांचे काम करावे आणि अनेक योजनाचा लाभ मिळवून देऊन जनतेचे अश्रू पुसण्याचे काम करावे, असेही श्री. पापळकर म्हणाले.

            पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महसूल व पोलीस विभाग हे प्रशासनाचे डबल इंजिन आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने परस्पर सहकार्याने काम केल्यास जनतेची कामे करणे सोयीचे होणार आहे, असे सांगून सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यानी नवीन तंत्रज्ञानानुसार प्रशासनाने झालेले बदल स्वीकारुन काम करणे आवश्यक आहे. तसेच आपले ज्ञान नवीन पिढीला देऊन त्यांना सक्षम केले पाहिजे. तसेच लोकांमध्ये जाऊन जनतेची कामे करुन लोकसंपर्क ठेवला पाहिजे. तसेच आपल्या सहकाऱ्यांशी कुटुंबातील सदस्य म्हणून वागणूक दिली पाहिजे, असे सांगून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. न्याय देण्याची भूमिका आपल्याकडे असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून शासनाने राबवित असलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करु शकतो. त्यामुळे शासनाने आपल्यावर महसूल सप्ताह साजरा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने कामे केल्यामुळेच हिंगोलीतील मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते मोकळे करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे मेरा माटी मेरा देश, आझादी अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यासारखे विविध कार्यक्रम यशस्वी करुन जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन केले.

            यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, तलाठी संघटनेचे आर. डी. गिरी, विनोद ठाकरे, आयुब, महसूल संघटनेचे प्रतिनिधी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. आभार प्रदर्शन औंढाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले.

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव

            गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महसूल दिनी सन्मान करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, लघुलेखक एन. एस. बोलके, एस.एन. कदम, जी. डी. शिंदे, डी.टी. पंचलिंगे, मंडळ अधिकारी सय्यद आयुब, के. एन. अंभोरे, आर. व्ही. सावंत, आशा गिते, महसूल सहायक एस.एन. पाटील, बी.एम. व्यवहारे, अ.खालेद, राहूल रेणगुंटवार, तलाठी जी.एस.रणखांब, व्ही.एन. ठाकरे, सुप्रिया जिंतूरकर, वाहनचालक मारोती शिरसाठ, शिपाई दिलीप भुक्तर, यशवंत वरड, एस.एन. लिंमकर, दिलीप ऐंगडे, देवजी मिस्कुटे, कोतवाल सतीश शिंदे, संदीप गाभणे, संतोष बर्वे, अमरदास पारीसकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

            यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

*****