01 February, 2024

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात

277 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड

 


हिंगोली (जिमाका), दि.01 :  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (NCS) हिंगोली व शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेचे 728 उमेदवार उपस्थित होते. या 728 उमेदवारांपैकी 277 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार हे होते. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  माधव सलगर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. क्षीरसागर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी महारोजगार मेळावा आयोजनामागील हेतू विषद करत युवकांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त रोजगार प्राप्त करावा. या बरोबरच उद्योजक आपल्या दारी या उक्तीचा देखील उच्चार केला. सुक्षिशित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यांसाठी व करिअर कसे निवडावे याबाबत नॅशनल करीअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली या कार्यालयात करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचेही आवाहन सहायक आयुक्त यांनी केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. धाराशीव शिराळे यांनी केले तर डॉ.प्रा. इक्बाल जावेद यांनी आभार मानले.  या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शिवाजी महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली कार्यालयाचे न. द. टोनपे, म. ना. राऊत, म. शां. लोखंडे, रा. द. कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.                                                         

      ******

 

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्यात विविध देवस्थानचे, ग्रामदेवताच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येत आहेत. यानिमित्त कब्बडी, कुस्त्या, किर्तन, संदल व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. तसेच दि. 8 फेब्रुवारी, 2024 रोजी शब-ए-मेहराज (बडी रात) व दि. 15 फेब्रुवारी, 2024 रोजी संत सेवालाल महाराज जयंती आहे. तसेच व्हीव्हीआयपी व स्वंरक्षित व्यक्ती जिल्ह्याच्या दौऱ्यांवर येत असतात. सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, सकल मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज, आदिवासी व बंजारा समाजाच्या वतीने आरक्षण संबंधाने मोठ्या प्रमाणात बैठका, सभा, मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे, आमरण उपोषणे करण्यात येत आहेत. शेतकरी, नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजीचे 23.59 वाजल्यापासून ते दिनांक 16 फेब्रुवारी, 2024 रोजीचे 23.59 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास  सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे  जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

**** 

 

अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रमांतर्गत नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु

अधिक माहितीसाठी नजीकच्या महाविद्यालयास भेट देण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि.01 :  राज्यात सद्यस्थितीत सुरु असणारे अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम बंद करुन राष्ट्रीय व्यवसाय आराखडयाप्रमाणे (NSQF) नवीन व्यवसाय सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित व अशासकीय कायम विनाअनुदानित संस्थामध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 पासून सुरु करण्यास व अभ्यासक्रमाच्या मानकांना शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत सुरु असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रममध्ये सत्र 2024-25 पासुन इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत सुरु असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमा ऐवजी पॅसीव भोपाळ यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये वर्ष 2024-25 मध्ये प्रवेश करण्यात यावेत. या नवीन अभ्यासक्रमाच्या सैध्दांतिक व प्रात्यक्षिक परीक्षाचे नियोजन व आयोजन हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत होणार असून या विषयांच्या सैध्दांतीक परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व प्रात्यक्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणार आहेत.

नवीन अभ्यासक्रम हे NSQF (National Skill Qualification Framework) प्रमाणे Pandit Sundarlal Sharma Central Institute of Vocational Education (Passcive) Bhopal यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत 200 गुणांचा एक अभ्यासक्रम द्विलक्षी अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्याऐवजी गटातील प्रत्येकी 100 गुणांचे विषय-1 व विषय -2 निवडणे आवश्यक राहील. नवीन द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले मानके उदा. विद्युत भार, वर्ग खोली, कार्यशाळा इत्यादी आवश्यक मानकांची पूर्तता संस्थेला पुढील दोन वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहील. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवित असलेल्या विद्यमान शासकीय, अशासकीय, अनुदानित व अशासकीय विना अनुदानित महाविद्यालयांना जुन्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुरु करावयाच्या नवीन अभ्यासक्रमांना ग्रीन चैनल पध्दतीने मान्यता देण्याबाबतचे आदेश शासनामार्फत लवकरच निर्गमित करण्यात येणार आहेत. विद्यमान संस्थांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

विद्यमान महाविद्यालयातील सद्यस्थितीत कार्यरत शिक्षकांनीच नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावयाचे असल्याने सद्यस्थितीत कार्यरत पूर्ण वेळ शिक्षण व पुर्ण वेळ शिक्षण (प्रात्यक्षिक) यांना आवश्यकते प्रमाणे प्रशिक्षण पॅसिव भोपाळ, सेक्टर स्कील कॉन्सिल किंवा अन्य यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे Chemical Plant Operator, Fish Processing Technology व Fresh Water Fish Culture हे व्यवसाय सुरु राहणार नसल्याने या अभ्यासक्रमामध्ये सत्र 2024-25 साठी इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश करता येणार नाही. पुनर्रचित अभ्यासक्रमातील प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विषय-1 अकरावी व बारावीसाठी 300 तासांचे तासिका राहतील. या 300 तासामध्ये 190 तास व्होकेशनल स्कील व 110 तास एन्प्लॉयबीलीटी स्कील राहील. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विषयासाठी मुल्यमापन योजना आहे. लेखी परीक्षेसाठी ८० गुण (30 गुणामध्ये रुपांतरीत) व प्रात्यक्षिक 50 गुण, प्रकल्प व अंतर्गत मुल्यमापन 20 गुण असे एकुण 100 गुणांची परीक्षा राहील. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवित असलेल्या महाविद्यालयास भेट द्यावी, असे आवाहन वि. प्र. रांगणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

 

फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि.01 :  मा. उच्च न्यायालय, विधी व सेवा उपसमिती, औरंगाबाद यांच्या पत्रान्वये परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 5 फेब्रुवारी ते दि. 23 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या लोक न्यायालय व शिबिरांच्या वाहनाचे उद्घाटन कार्यक्रम दि. 5 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या फिरते लोक न्यायालय व शिबीर कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

 हिंगोली जिल्ह्यात दि. 6 फेब्रुवारी, 2024 रोजी वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम, चोंडी अंबा, दि. 7 फेब्रुवारी रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी, गोळेगाव येथे, दि. 8 फेब्रुवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील शिवणी, तुपा येथे, दि. 9 फेब्रुवारी रोजी हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे आणि दि. 12 फेब्रुवारी, 2024 रोजी सेनगाव तालुक्यातील खुडज, नर्सी नामदेव येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.  

परभणी जिल्ह्यात दि. 13 फेब्रुवारी, 2024 रोजी जिंतूर तालुक्यातील कौसडी, बोरी येथे, दि. 14 फेब्रुवारी रोजी येथे सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी, ढेंगळी पिंपळगाव येथे, दि. 15 फेब्रुवारी रोजी मानवत तालुक्यातील अंबेगाव व सावरगाव येथे, दि. 16 फेब्रुवारी रोजी पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते येथे, दि. 17 फेब्रुवारी रोजी सोनपेठ तालुक्यातील सायखेडा व शेळगाव येथे, दि. 20 फेब्रुवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील खादगाव व अकोली येथे, दि. 21 फेब्रुवारी रोजी पालम तालुक्यातील केरवाडी व चाटोरी येथे, दि. 22 फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील कानखेडा व ताडकळस येथे आणि दि. 23 फेब्रुवारी, 2024 रोजी परभणी तालुक्यातील बलसा खुर्द व जिल्हा न्यायालय परभणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या फिरते लोक न्यायालय व शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

******

 

कुष्ठरोग जनजागरण रॅलीचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ


 

हिंगोली (जिमाका), दि.01 :  महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 30 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली शहरामध्ये कुष्ठरोग जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. सुनिल देशमुख, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. मंगेश देशमुख यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

या रॅलीमध्ये सामान्य रुग्णालयातील अधिपरिचर्या प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. याप्रसंगी टुटर वर्षा खंदारे, पीएचएन वर्षा परळीकर, डीपीएन सुनिल दिंडे, एम.जी. पवार, सी. एस. पाटील, गौतम भालेराव, पंढरीनाथ जटाळे, डॉ.करिष्मा जाधव, विद्या वायभट, जयश्री ठाकरे, गजानन आघाव, शंकर ठाकरे व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान स्पर्श जनजागृती अभियान

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श जनजागृती अभियान दि. 30 जानेवारी ते दि. 13 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विविध कुष्ठरोग विषयी जनजागरण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), हिंगोली कळविले आहे.

*****

 

ग्रामीण घरकुल बांधण्यासाठी जमिनीचे खरेदीखत दस्त नोंदणीसाठी

परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान

 

हिंगोली (जिमाका), दि.01 :  महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. या अधिसूचनेत ग्रामीण घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्याला कमाल 500 चौरस फुटापर्यंत हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतील असे नमूद आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी वसमत यांनी घरकुलासाठी एक आर जमीन खरेदी करण्यासाठी अर्जदार उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तगादा करीत असल्यामुळे शासन अधिसूचना दि. 14 जुलै, 2023 मधील जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार सर्व उपविभागीय अधिकारी यांना पद्रान करण्याची विनंती केली आहे.

महसूल व वन विभागाकडील अधिसूचना दि. 14 जुलै, 2023 (2 घ) (ख) नुसार जिल्हाधिकारी यांचे अधिकार हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी अधिसूचनेतील तरतुदी आणि नियमात विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून वर्ग करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि. 30 जानेवारी, 2024 रोजी काढलेल्या आदेशान्वये दिले आहेत.  

******

29 January, 2024

 

चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात संपन्न


 

हिंगोली (जिमाका), दि.29 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने दि. 27 जानेवारी ते दि. 29 जानेवारी, 2024 या कालावधीत चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या बालकांच्या कलागुणांना वाव देणे हा बाल महोत्सव घेण्यामागचा उद्देश होता. या बाल महोत्सवाचे उद्घाटन गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक सोनाजी आम्ले यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. निशांत माणका, आदर्श महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जाधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे उपस्थित होते.

या आयोजित तीन दिवशीय बाल महोत्सवात लहान गट व मोठा गट असे विभागून धावणे, कबड्डी, लांब उडी, गोळा फेक, पोत्याची रेस, दोरीवरील उड्या, कॅरम, बुध्दीबळ, रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यामार्फत बालविवाह पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमात बालगृहातील बालके तसेच विद्यासागर विद्यालय खानापूर चित्ता व आदर्श विद्यालय येथील मुलांनी उत्साहाने कार्यक्रमात भाग घेऊन आपले कलागुण सादर केले. या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या बालकांचे पारितोषिक  वितरण अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाल रोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी तथा सरस्तवती मुलींचे निरीक्षणगृह व बाल गृहाच्या अधीक्षक रेखा भुरके, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, बाली भोसले, संगीता दुबे, किरण करडेकर, बाल न्याय मंडळ सदस्य सत्वशीला तांगडे, उज्वल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाईकराव उपस्थित होते.

******