21 February, 2024

हिंगोली येथे आजपासून ‘महासंस्कृती महोत्सव 2024’

हिंगोली येथे आजपासून ‘महासंस्कृती महोत्सव 2024’ • कार्यक्रम सर्वांसाठी खुला • पालकमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन • जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी कार्यक्रमांची रसिकांना मिळणार अनुभूती हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यात उद्या गुरुवार (दि.22)पासून ‘महासंस्कृती महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, दि. 22 ते दि.26 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रामलीला मैदान येथे दररोज सायंकाळी 6 वाजता सुरु होणार असून, तत्पूर्वी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह खा. हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य आमदार सर्व श्री. सतीश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, श्रीमती प्रज्ञा सातव, आमदार सर्व श्री. तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, संतोष बांगर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. यात गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश स्थानिक कलावंताच्या कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व चमू गोंधळी, देविदास वाकुडे व चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गायक, गायिका म्हणून मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये 32 कलाकारांद्वारे नृत्याचे सादरीकरण होणार असून कॉमेडी स्कीट म्हणून नामवंत टीव्ही कलावंत प्रकाश भागवत, प्रविण डाळिंबकर, सागर भोईर हे काम पाहणार आहेत. शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य, सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चिस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी सादर करण्यात येईल. यामध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होईल. यामध्ये बबन दिपके व चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पांडूरंग पाबळे व चमू वाघ्या-मुरळी, शिवाजी राऊत व चमू जागरण गोंधळ घालणार असून, शेषराव कावरखे यांची चमू लेक वाचवा, लेक शिकवा, शाम धोंगडे यांची चमू नाटिका, श्रीरंग दांडेकर यांची चमू भीमगीते सादर करणार आहे. सायं. 6.30 वाजता केशर केवडा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यासाठी कौस्तुभ दिवाण हे निवेदक म्हणून काम पाहणार आहेत. जुई बेंडखळे, आय्ली घिलीया, आरती शिंदे, सोनाली पाटील व स्मिता शेवाळे हे नृत्य सादर करणार आहेत. यासाठी आनंदी जोशी, चेतन लोखंडे व 25 कलाकारांचा संच गायन सादर करतील. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे. सायं. 6.30 वाजता लख लख चंदेरी-2024 कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यासाठी पुष्कर श्रोत्री हे निवेदन करणार आहेत. राजेश्वरी खरात, गौरी कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, श्वेता खरात हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत. यासाठी मयुर सुकाळे यांचे गायन असणार आहे. कमलाकर सातपुते आणि किशोरी अंबिये यांच्यासोबत 25 कलाकारांचा संच स्कीट सादर करणार आहे. याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *******

रेणापूर येथील सर्व विषबाधितांची प्रकृती स्थिर • आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 21 : कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने रात्री उशिरा 179 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून गावातच 115 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तर 64 जणांवर हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने 179 जणांना त्यातून विषबाधा झाली. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाने तात्काळ गावाला भेट देऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. तसेच गावातील पाण्याचे स्त्रोत तसेच भगरीचे नमुने घेतले असून, पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे एकूण 32 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 18 पुरुष, 13 महिला आणि एका बालकाचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तात्काळ रेणापूर येथे भेट दिली असून, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण, साथरोग अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह वैद्यकीय पथक गावात आहे. या पथकाने गावातील पाणी स्रोत तपासणी तसेच जेवणातील पदार्थांचे नमुने घेतले असून, रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. ******

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली या कार्यालयांतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. या वसतिगृहामध्ये इमाव-51, विजाभज-33, विमाप्र-6, दिव्यांग-4, अनाथ-02 व आर्थिक मागास प्रवर्ग-4 असे एकूण 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनीसाठी प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण लागू असेल. सन 2023-24 साठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 5 मार्च, 2024 या कालावधीत ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावेत. या प्रवेशाची पहिली निवड यादी दि. 15 मार्च, 2024 पर्यंत गुणवत्तेनुसार अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 25 मार्च, 2024 ही अंतिम मुदत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची दि. 28 मार्च, 2024 रोजी गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 5 एप्रिल, 2024 रोजी प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद/वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषि परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयामध्ये मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार तसेच संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 70 टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. विद्यार्थी स्थानिक नसावा. व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीएचे गुण असणे आवश्यक राहील. या वसतिगृहामध्ये प्रवेश हा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षासाठी प्रवेश देय राहील. उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी लागणारे ऑफलाईन अर्ज सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी विहित वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्यामार्फत दि. 22 ते 24 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर, असेंब्ली, क्वालिटी चेकरच्या 30 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून, या पदासाठी 14 हजार ते 16 हजार वेतन देण्यात येणार आहे. तसेच श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि. कळमनुरी या कंपनीमध्ये सुपरवायझर पदाच्या 10 जागा भरण्यात येणार असून यासाठी बारावी, डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. या पदासाठी मासिक वेतन 8 हजार ते 10 हजार देण्यात येणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा. लि. पुणे व श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि.कळमनुरी या कंपनीचे 40 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7385924589, 7972888970 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ****

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सकल मराठा समाजाच्या वतीने होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन संबंधाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आंदोलन काळात अचानक उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये केली आहे. या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील हा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार एम. एस. खंदारे, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिल सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त दंडाधिकाऱ्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत जिल्ह्यात सकल मराठा आरक्षण आंदोलन काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत. *****

दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 19 मार्च, 2024 पर्यंत आणि बारावीची परीक्षा दि. 01 ते दि. 26 मार्च, 2024 या कालावधीत येण्यात येत आहेत. या परीक्षा कालावधीत दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायं. 5वाजेपर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध असतील. परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्तासाठी पाठवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना परवानगी लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल. या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. *****

20 February, 2024

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, लिपिक कैलास लांडगे उपस्थित होते. *****