26 September, 2020

कृषि मंत्री दादाजी भुसे यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 


        हिंगोली, दि.26 : राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री  दादाजी भुसे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

           कृषि मंत्री श्री. भुसे यांचे  शनिवार, दिनांक 26 सप्टेंबर, 2020 रोजी  सायंकाळी 07.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व कृषि विषयक योजनांचा आढावा बैठक.

           तसेच रविवार, दिनांक 27 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 07.00 वाजता हिंगोली जिल्ह्यात पाऊस आणि पुरामूळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 07.30 वाजता हिंगोली येथून शासकीय मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

*****

 

 

24 September, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण; तर 51 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


• 304 रुग्णांवर उपचार सुरु

        हिंगोली,दि.24: जिल्ह्यात आज 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर 09 व्यक्ती,वसमत परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 01 व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर वसमत परिसर 03 व्यक्ती, हिंगोली परिसर 05 व्यक्ती आणि कळमनुरी परिसर 02 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज 51 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 22 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 6 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 28 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 474 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 137 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 304 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 33 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

****

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 63 हजार 333 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

 


हिंगोली,दि.24: जिल्ह्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत दिनांक 22 सप्टेंबर, 2020 अखेर 63 हजार 333 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान कोव्हिड आजाराची 8 रुग्ण, इतर आजाराची 2 हजार 318 रुग्ण असे एकूण 2 हजार 326 संशयित रुण आढळून आले आहेत. तर कोमार्बीड व्यक्तींची संख्या 256 एवढी आढळून आली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 595 पथके स्थापन करण्यात आली असून या पथकामध्ये 1 हजार 785 कर्मचाऱ्यांची तसेच प्रत्येक 5 ते 10 पथकामागे एक याप्रमाणे उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी 37 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संशयित रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी 29 ॲम्ब्युलन्स  उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

या मोहिमेदरम्यान गृहभेटीच्या वेळी विरीत करण्यासाटी 3 लाख पाँप्लेट तयार करण्यात आले आहेत. तसेच 25 होर्डींग्ज व 2 हजार 600 बॅनर्स तयार करण्यात आली आहेत. तसेच समाज माध्यमावर जनजागृतीसाठी फेसबुक साठी 15 तर व्हॉट्सॲप साठी 123 संदेश तयार करण्यात आले आहेत. युनिसेफ व आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी दोन व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत.

या मोहिमेसाठी ग्राम, तालुका व जिल्हास्तरावरील लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे, अशी माहितीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली .

000000

पोलीस पेट्रोल पंपावर गुणवत्ता व विश्वासार्हता जोपासण्यात येईल -- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी

 


                * हिंगोली पोलीस पेट्रोल पंप, बास्केट बॉल व स्केटींग ग्राऊंड, ग्रॉसरी शॉपचे उद्घाटन संपन्न.

            हिंगोली, दि.24: पोलीस कल्याण निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपावर गुणवत्ता व विश्वासार्हता जोपासण्यात येणार असून त्याचा दर्जाही चांगला राहणार आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपावर तक्रारींसाठी कोणत्याही प्रकारचा वाव राहणार नसल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले.

            येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या शेजारी इंदिरा चौकात उभारण्यात आलेल्या पोलीस पेट्रोल पंपाचे, पोलीस वसाहतीतील बास्केट बॉल व स्केटींग ग्राऊंड व ग्रॉसरी शॉपचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील, इंडियन ऑईलचे औरंगाबाद विभागाचे उप महाप्रबंधक सुहास तुमाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            यावेळी बोलतांना श्री. तांबोळी म्हणाले की, स्नेह व प्रेमाची जाणीव ठेवून हा पेट्रोल पंप चालणार आहे. या पेट्रोल पंपाच्या माध्यमातुन मिळणा-या उत्पन्नाचा पोलीस कल्याण निधीसाठी वापर करण्यात येणार असून पोलीस विभागातील अधिकारी  व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय, शिक्षण तसेच लग्नसमारंभासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या पंपाच्या उभारणीसाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानून या पेट्रोल पंपाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

            जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या पेट्रोल पंपाच्या योगदानामूळे पोलीस कल्याण निधीला सृदृढ बनविण्याचे सत्कार्य घडणार असून पोलीस सृदृढ असल्यास सारा देश सृदृढ राहील असे सांगून या पेट्रोल पंपाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.

            पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आपल्या प्रास्ताविकात पेट्रोल पंप उभारणी मागची भूमिका विशद करतांना सांगितले की, हा पेट्रोल पंप केवळ सहा महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. हा पंप विश्वासात कधीही कमी पडणार नाही. येथील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याठिकाणी शुध्द पेट्रोल, डिझेल भरुन पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी आमदार तान्हाजी मुटकुळे आणि इंडियन ऑईलचे औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक सुहास तुमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी कोव्हीड-19 मुळे निधन झालेल्या राज्य राखीब पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक कुंडलीक अंभोरे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते पेट्रोल पंपाच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या कंत्राटदार, अधिकारी-कर्मचारी यांचा रोपटे देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.

****

 

23 September, 2020

जिल्हा माहिती कार्यालयातील भंगार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध

 

जिल्हा माहिती कार्यालयातील भंगार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध

 

            हिंगोली, दि.23: येथील जिल्हा माहिती कार्यालयात जुने भंगार साहित्य, जुने टायर विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना भंगार साहित्य, टायरे घ्यावयाचे असेल त्यांच्यासाठी कार्यालयीन सुचना फलकावर भंगार साहित्याची यादी पाहावयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नोंदणीकृत खरेदीदारांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6, हिंगोली या पत्यावर दि. 30 सप्टेंबर, 2020 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 

            भंगार साहित्य व जुने टायर विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .

****

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

हिंगोली,दि.23:   जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे. तसेच 02 ऑक्टोबर, 2020 ला महात्मा गांधी जयंती असून त्याच दिवशी लालबहादूर शास्त्री जयंती आहे. तसेच विविध संघटनेतर्फे त्यांच्या मागणी संदर्भाता मोर्चे, धरणे आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध संघटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 22 सप्टेंबर, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 06 ऑक्टोबर,2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.

त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

22 September, 2020

बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे

मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे

                                         -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

 

              हिंगोली,दि.22: अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आले असुन प्राप्त झालेले कर्ज प्रकरणे मंजूर करुन पात्र लाभार्थ्यास तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या उद्दिष्ट पूर्ततेचा आढावा आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी डीएलसीसी बैठकीमध्ये घेतला त्यावेळी ते बोलत होते. बऱ्याच बँका या पीक कर्ज वाटपाचे कारण सांगून महामंडळाच्या कर्ज प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याच्या लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व बँकांनी लाभार्थ्यांस कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना त्याची पोहोच पावती देण्याचे निर्देश बँकांना दिले. तसेच महामंडळाकडुन प्राप्त होणारी कर्ज प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बँकांना दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना राज्यातील ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आली आहे.

            लाभार्थ्याना आपले कर्ज प्रकरण आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी केली जाते. नंतर प्रकरण बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविले जाते. बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्रकरणाची छाननी करुन महामंडळाकडून जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बीज भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.

           

****