20 February, 2024

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार संतोष बोथीकर, डी. एस. जोशी, सचिन जोशी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

‘महासंस्कृती महोत्सवा’च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा • 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान रामलीला मैदानावर आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हिंगोली येथील रामलीला मैदानावर येत्या गुरुवारपासून पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी रामलीला मैदानावर भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, सुप्रसिद्ध कलाकारांसह स्थानिक कलाकारांच्या कला सादर करण्यात येणार आहेत. विविध संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत असणाऱ्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हा सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होत असून, त्याचे सोमवार (दि. 26) पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. *****

19 February, 2024

हिंगोली येथे गुरुवारपासून पाच दिवस ‘महासंस्कृती महोत्सव’

हिंगोली येथे गुरुवारपासून पाच दिवस ‘महासंस्कृती महोत्सव’ • पालकमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन • महासंस्कृती महोत्सव 2024 हिंगोलीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार • जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी या कार्यक्रमाची रसिकांना मिळणार अनुभूती हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच ‘महासंस्कृती महोत्सव’आयोजित करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवाचे गुरुवार, दि. 22 ते दि. 26 फेब्रुवारी, 2024 पर्यंत रामलीला मैदान हिंगोली येथे दररोज सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार दि. 22 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह खा. हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. सतीश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, प्रज्ञा सातव, तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, संतोष बांगर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे या महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी पासून होत आहे. दि. 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हिंगोली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. यात गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व त्यांची चमू गोंधळी, देविदास वाकूडे व त्यांची चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व त्यांची चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गायक, गायिका म्हणून मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये 32 कलाकारांद्वारे नृत्याचे सादरीकरण होणार असून कॉमेडी स्कीट म्हणून नामवंत टीव्ही कलावंत प्रकाश भागवत, प्रविण डाळिंबकर, सागर भोईर हे काम पाहणार आहेत. शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सांय. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य , सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चीस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा ही कला सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अप्सरा फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. गायक व गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बबन दिपके व त्यांची चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व त्यांची चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पांडूरंग पाबळे व चमू वाघ्या-मुरळी, शिवाजी राऊत व चमू जागरण गोंधळ घालणार असून, शेषराव कावरखे यांची चमू बेटी बचाव-बेटी पढाओ, शाम धोंगडे यांची चमू नाटिका, श्रीरंग दांडेकर यांची चमू भीमगीते सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता केशर केवडा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यासाठी कौस्तुभ दिवाण हे निवेदक म्हणून काम पाहणार आहेत. जुई बेंडखळे, आय्ली घिलीया, आरती शिंदे, सोनाली पाटील व स्मिता शेवाळे हे नृत्य सादर करणार आहेत. यासाठी आनंदी जोशी, चेतन लोखंडे व 25 कलाकारांचा संच गायन सादर करतील. महासंस्कृती या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे. सायं. 6.30 वाजता लख लख चंदेरी-2024 कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यासाठी पुष्कर श्रोत्री हे निवेदन करणार आहेत. राजेश्वरी खरात, गौरी कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, श्वेता खरात हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत. यासाठी मयुर सुकाळे यांचे गायन असणार आहे. कमलाकर सातपुते आणि किशोरी अंबिये यांच्यासोबत 25 कलाकारांचा संच स्कीट सादर करणार आहे. याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महासंस्कृती महोत्सव 2024 चा नागरिकांनी आस्वाद घ्यावा - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या महाराष्ट्राला कला व संस्कृती यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. रूढी, परंपरा, सण, उत्सव, महोत्सव यामधून आपला महाराष्ट्र; सामाजिक, वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ झालेला आहे. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महाराष्ट्रातील लोककला, कृषी संस्कृती, चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीत, आदिवासी संस्कृती यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्थल-कालानुसार वेगवेगळे कला व संस्कृतीचे प्रकार पहावयास मिळतात. राज्यातील विभिन्न प्रदेशातील विभिन्न संस्कृतीचे दर्शन, प्रत्येक जिल्ह्यातील रसिकांना व्हावे यासाठी महासंस्कृती कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात, संपूर्ण राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन होईल. त्यामुळे आपण सर्व हिंगोलीकरांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक -अपर जिल्हाधिकारी • ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या गीताचे सामूहिकरित्या गायन हिंगोली (जिमाका), दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष पूर्ण जगभर साजरे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास मोठा आहे. त्यांचे कार्य पुस्तकात न मावणारे आहे. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे, कार्य, जबाबदाऱ्या, स्वातंत्र हे त्यांच्यामुळेच आपणाला मिळाले आहे. आपण जीवन जगत असताना त्यांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते. उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, गड-किल्ले यांची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचविणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, संतोष बोथीकर, मधुकर खंडागळे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी आम्रपाली चोरमारे, विजय घ्यार, कुसुम भिसे, माया नरवाडे यांनी छपत्रती शिवाजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ‘‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’’ या राज्य गीताचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिकरित्या मोठ्या उत्साहात गायन करण्यात आले. यावेळी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीतून शिवरायांची प्रतिमा काढण्यात आली. ***

17 February, 2024

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत डॉक्टरला ठोठावली शिक्षा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम-2003 (पीसीपीएनडीटी) या कायद्यांतर्गत धडक मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी त्यांच्या टीमसह निदान डायग्नोस्टिक सोनोग्राफी सेंटर तपासणी केली असता त्यांना सोनोग्राफी सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे सुदेश भरतिया या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. डॉक्टर बोल्डे यांनी न्यायालयात फिर्यादी म्हणून पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत डॉक्टर सुदेश भारतियाविरुद्ध प्रकरण दाखल केले होते. त्या कार्यक्रमांमध्ये विधी समुपदेशक म्हणून वेळोवेळी ॲड. सुकेशिनी ढवळे-हादवे यांनी पीसीपीएनडीटीचे कामकाज पाहिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील निखिल चंदेल यांनी अंतिम युक्तिवाद करण्यास मदत केली होती. या प्रकरणात चार साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.जी. देशमुख यांनी निकाल देताना न्यायालयापुढे आलेल्या पुरावाच्या आधारे डॉ.भरतिया याला पीसीपीएनडीटी कायद्याअन्वये कलम 17 (2) व नियम 9 (8) अन्वये दोन महिने साधा कारावास व एकूण दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस एस .बी. तोडेवाले यांनी मदत केली. ******

अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन धोरण जाहीर ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावेत

• जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळु उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, वसमत तालुक्यातील हट्टा, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा व बरडा येथे वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार नदीतून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर (GST सह), स्वामित्वधनाची रक्कम, शासनामार्फत आकारण्यात येणारा जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी, पर्यावरण शुल्क व नियमानुसार अनुज्ञेय शुल्क/कर इत्यादी, वाळू डेपोतून वाळू वाहतूकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल. या अटीवर वरील डेपोवरुन ग्राहकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येत आहे. वरील प्रमाणे दर निश्चित करुन डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळुच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री करण्यात येणार आहे. वाळू धोरण 2024 च्या अनुषंगाने वाळु बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजरवर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडो मध्ये उघडेल. त्यानंतर LOGIN या बटनावरती क्लिक करावे. त्यानंतर CONSUMER SIGN UP क्लिक करुन त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर व स्वतःचा ई-मेल आय डी. इत्यादी आवश्यक माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर LOGIN मध्ये USERNAME म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईल मध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकुन LOGIN करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन मध्ये घर, इमारत, घरकुल, ईत्यादी बाबत आपली माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. व आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी. वाहतुकीचा खर्च सबंधित ग्राहकाने करावा. वरीलप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन धोरण जाहीर घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास वाळू मोफत

• जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळु उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, वसमत तालुक्यातील हट्टा, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा व बरडा येथे वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार वरील नमूद डेपोवरुन तसेच अवैध उत्खनन व वाहतुक कारवाईमध्ये जप्त केलेली वाळू प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित घरकुल लाभार्थ्यांनी खालील प्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करावी. घरकुल लाभार्थी असल्याचा तपशील सबंधित विभाग, तहसील कार्यालयाकडे सादर करावेत. त्यानुसार सदर माहिती महाखनीज प्रणालीवर अद्यावत करण्यात येईल. सबंधित विभागांनी माहिती सादर करत असताना त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, लाभार्थीचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभार्थीचे पत्ता घरकुल योजनेचे नाव मंजुरी क्रमांक (SANCTION नंबर) इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. संबधित लाभार्थ्यांची माहिती तहसील कार्यालयाकडून अद्यावत केल्यानंतर लाभार्थीनी महाखनीज प्रणालीवर वाळू बुकिंग करावी. यासाठी सर्वप्रथम WWW.MAHAKHANIJ.MAHARASHTRA.GOV.IN या संकेतस्थळावर भेट देऊन SAND बुकींग पर्यायावर क्लिक (CLICK) करुन SAND बुकींगवर लॉगिन पेजवर सर्वप्रथम आपला पासवर्ड (GENRATE PASSWARD) तयार करुन घ्यावा. त्यानंतर लॉगीन पेज वर स्वतःचा मोबाईल क्रमांक युजर नेम मध्ये समाविष्ट करावा त्यानंतर पासवर्ड टाकावा. त्यानंतर CAPTCHA कोड जसा आहे तसा टाकुन लॉगीन करावे. लॉगीन झाल्यानंतर SAND बुक या पर्यायाचा वापर करून 5 ब्रास वाळू बुक करुन बुकिंगची पावती प्राप्त करावी. बुकिंग केलेली पावती घेऊन वाळु डेपो वरुन 5 ब्रास वाळु पंधरा दिवसाच्या आत घेऊन जाणे बंधनकारक आहे. वाहतुकीचा खर्च सबंधित ग्राहकाने करावा. घरकुल लाभार्थ्यांनी वरीलप्रमाणे प्रक्रिया करुन जास्तीत जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरयांनी केले आहे. *******