.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
21 November, 2024
तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी
• विधानसभा मतमोजणी केंद्र निश्चित
• विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि.21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रती मतदार संघ 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकासाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
*विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्र*
92-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी रोड वसमत ता. वसमत जि. हिंगोली येथे होणार आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी जि. हिंगोली येथे होणार आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, एमआयडीसी, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी 1023 मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
*विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती*
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात 72 टक्के मतदान
• वसमत विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान
• हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक
• पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी
• तृतीयपंथीयाचे 50 टक्केच मतदान
हिंगोली (जिमाका), दि.21: हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 72.24 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 75.05, कळमनुरी 73.63 आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात 68.16 टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, खर्च निरीक्षक श्री. अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. राकेशकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली.
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 40 हजार 737 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 26 हजार 818 पुरुष, 1 लाख 13 हजार 917 महिला तर 2 तृतीयपंथी मतदाराने मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 43 हजार 490 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 28 हजार 771 पुरुष, तर 1 लाख 14 हजार 718 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 2 लाख 27 हजार 202 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 19 हजार 750 पुरुष, 1 लाख 7 हजार 450 महिला आणि 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 92-वसमत विधानसभा मतदार संघ (75.05 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (68.16 टक्के) सर्वात कमी राहिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख तसेच जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
*******
20 November, 2024
निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांची विविध मतदान केंद्राला भेट
हिंगोली (जिमाका), दि. 20: जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज हिंगोली येथील सरजू देवी भिकुलाल आर्य कनिष्ठ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्र, सिटी क्लब येथील सखी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीमती वंदना राव यांनी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघ कार्यालयास व तेथे असलेल्या आदर्श आचारसंहिता कक्ष, प्रसार माध्यम कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, आदर्श आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी अरविंद मुंढे, प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी पंडित मस्के, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती राव यांनी 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील कळमनुरी, साळवा, आखाडा बाळापूर व शेवाळा येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
******
हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदान
• निवडणूक विभागाची 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर
• पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त
• आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून 9 मतदान केंद्रांचे संचलन
हिंगोली, (जिमाका) दि.20: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 11, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 19 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 23 असे जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी 7 वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदान सुरु असल्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 59.67, 93-कळमनुरी 63.20 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून, त्यामध्ये 5 लाख 10 हजार 393 पुरुष तर 4 लाख 74 हजार 361 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 10 मतदारांचा यात समावेश आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 20 हजार 765 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 64 हजार 931 पुरुष, 1 लाख 55 हजार 828 महिला व 6 इतर मतदारांचा यात समावेश आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 30 हजार 686 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 71 हजार 937 पुरुष, 1 लाख 58 हजार 747 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 33 हजार 313 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 73 हजार 525 पुरुष, 1 लाख 59 हजार 786 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव, निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेश कुमार बन्सल यांनी हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे भल्या पहाटेपासून ते दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी वेबकास्टींगच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन केले. तर निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहस्थित 515 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या वेब कास्टींग रुमला भेट देत पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तर जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) हे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पार पाडले आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र-3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे.
या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते.
जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
प्रथम मतदान करणारे युवा-युवती, ज्येष्ठ मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा…!
जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात प्रथम मतदान करणारे युवक-युवतींनी मतदान करणासाठी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सुरुवातीपासूनच मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष देत सर्व पथकप्रमुखांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देत वेळोवेळी आढावा घेतला.
सर्व पथक प्रमुखांचा सहभाग
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी 22 पथक प्रमुखांच्या समिती स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणूक साहित्य, वाहतूक व्यवस्था, तांत्रिक कक्ष, स्विप, कायदा व सुव्यवस्था, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्थापन, उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व सर्व्हीस व्होटर, प्रसार माध्यम व संदेशवहन, संपर्क आराखडा, मतदार यादी व्यवस्थापन, मदत कक्ष व तक्रार निवारण, दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व सोयीसुविधा पुरविणे, वेब कास्टींग, परवानगी कक्ष, अवैध मद्यवाटपास प्रतिबंध, सी-व्हीजील ॲप, निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली, निवडणूक निरीक्षकांचे नोडल अधिकारी आदी समिती प्रमुखांनी या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
******
वसमत व कळमनुरी विधानसभा मतमोजणीसाठी हिमांशू कुमार गुप्ता व श्रीमती टी. एल. संगीता निरीक्षक
• हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव यापूर्वीच दाखल
हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी हिमांशू गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती संगीता यांची तर 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती वंदना राव ह्या यापूर्वी हिंगोली जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून काम करत आहेत.
92-वसमत विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी निरीक्षक श्री. गुप्ता हे 2013 उत्तर प्रदेश कॅडरचे एससीएस सेवेचे अधिकारी असून 8604015479 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी निरीक्षक श्रीमती टी. एल. संगीता तेलंगाणा कॅडरच्या 2022 च्या एससीएस बॅचच्या अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 9515678010 असा आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी निरीक्षक श्रीमती वंदना राव या सन 2015 च्या दिल्ली कॅडरच्या आयएएस अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 7820869248 असा आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेल्या मतमोजणी निरीक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
• जिल्हाधिकारी यांनी घेतली सेल्फी
• लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी केले आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल व त्यांच्या सुविद्य पत्नी शुभी गोयल यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी व त्यांच्या पत्नीनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
******
19 November, 2024
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल
• हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील पथके मतदान केंद्राकडे रवाना
• ‘है तय्यार हम’ निवडणूक कामी नियुक्त पथकांची भावना
हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची मतदानासाठी जय्यत तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, दि. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील पथके आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली आहेत.
वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते आणि हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नियंत्रणाखाली ही पथके आज सकाळपासून रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘है तय्यार हम’ची भावना व्यक्त केली.
92-वसमत विधानसभा मतदार संघ
92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 1702 मतदान अधिकारी, 656 पोलिस कर्मचारी व होमगार्ड, 328 शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्तरावरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात येणार आहे. समन्वय करण्यासाठी 38 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या 18 पथकामार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. सशस्त्र सेना बलाचे 90 जवान मतदार संघात गस्तीवर असतील.
सर्वांनी निर्भयपणे व न चुकता मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेऊन त्यांना मतदान यंत्र व मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य देऊन 352 मतदान केंद्रावर 36 क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथके रवाना करण्यात आली.
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 352 मतदान केंद्राध्यक्ष, 1056 मतदान अधिकारी, 95 महिला कर्मचारी, 704 पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण 2207 अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहेत.
या कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या सहाकार्याने मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पाठविण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे.
94-हिंगोली विधानसभा मतदार संघ
94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 343 मतदान केंद्रांवर 1524 अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी 35 मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सर्व पथके हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केद्रांकडे रवाना करण्यात आली आहेत. त्यासाठी 25 बस, 6 मिनीबस, 108 जीप व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय करण्यासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)