08 November, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांचे द्वितीय सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण
• केंद्रनिहाय मतदान यंत्रांचे क्रमांक झाले निश्चित
हिंगोली (जिमाका), दि 08: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 15 मतदान केंद्र आणि 8 सहाय्यकारी मतदान केंद्रासाठी आवश्यक मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरण प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांचे क्रमांक निश्चित झाले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, कळमनुरी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, ईव्हीएम मशीनच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी यांच्यासह जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, तसेच उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रांच्या 20 ते 30 टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आल्या आहेत. तसेच 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट लावण्यात येणार असल्याने त्या प्रमाणात बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले आहे.
92-वसमत विधानसभा मतदारसंघातील 327 मतदान केंद्र आणि 1 सहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी 488 बॅलेट युनिट, 395 कंट्रोल युनिट आणि 429 व्हीव्हीपॅट मशीन, 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील 345 मतदान केंद्र आणि 7 सहाय्यकारी मतदान केंद्रासाठी 884 बॅलेट युनिट, 428 कंट्रोल युनिट आणि 462 व्हीव्हीपॅट मशीन आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रांसाठी 881 बॅलेट युनिट, 415 कंट्रोल युनिट आणि 449 व्हीव्हीपॅट मशीन वितरीत करण्यात आल्या आहेत.
मतदान यंत्रांच्या दुसऱ्या सरमिसळीकरणानंतर कोणत्या क्रमांकाचे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार आहे, ही निश्चित झाले आहे.
या सरमिसळीकरण प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, ही सरमिसळीकरणाची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाखाली सॉफ्टवेअरद्वारे राबविण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. या मशीन तयार करण्याचे काम संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली व आपल्या उपस्थितीत दि. 13 व 14 नोव्हेंबर रोजी तयार करून त्याचे सिलींग करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चलतचित्रण (व्हिडिओ शुटींग) करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी गृहभेटीद्वारे मतदान (होम वोटींग) दि. 9 व 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून याचा रुट प्लॅन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तयार केला असून ते उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना देतील. तसेच कर्मचाऱ्यांचेही सरमिसळीकरण होणार असल्यामुळे कोणता कर्मचारी कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची संबंधित कर्मचाऱ्याला शेवटपर्यंत माहिती नसते. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 11 व 12 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे टपाली मतदान घेण्यात येणार असल्याचे सांगून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना दिली. तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे समाधान केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment