07 November, 2024
राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी तीन दिवसापूर्वी अर्ज करावेत • 19, 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणिकरण आवश्यक
हिंगोली (जिमाका), दि.7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना उमेदवारांनी दि. 19 व 20 नोव्हेंबर (मतदान पूर्व आणि मतदानाच्या दिवशी) रोजी प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दीच्या तीन दिवसापूर्वी जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिरात करावयाची असल्यास जाहिराचा मजकूर एमसीएमसी पूर्व-प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. तथापि, सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे.
जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे तीन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार मतदानापूर्वीचा व मतदानाच्या दिवसासाठी अनुक्रमे शुक्रवार व शनिवारपर्यंत अर्ज येणे आवश्यक आहे. प्रमाणिकरणाचे अर्ज एक खिडकी कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सोशल मीडिया व यू-ट्यूबर्सना दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक
उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment