14 November, 2024

मतदान केंद्रावरील सुविधा सुनिश्चित करा प्रशासनाच्या सर्व शाळा व आस्थापनांना सूचना

हिंगोली, (जिमाका) दि.14: शासकीय असो वा खासगी शाळा व अन्य कार्यालय मतदान केंद्रे निश्चित झालेल्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे मुख्याध्यापक व संस्थाप्रमुखांची जबाबदारी आहे. 19 नोव्हेंबरला मतदान चमूच्या आगमनापासून तर 20 नोव्हेंबरला मतदान होईपर्यंत सर्व सुविधा निश्चित करण्यात याव्यात, असे निर्देश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्हाभरातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी संस्थांमध्ये मतदान केंद्र निश्चित झाली आहेत. या ठिकाणी पायाभूत सुविधांसोबतच रात्रीची प्रकाश व्यवस्था सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पुरेशा दिवाबत्तीची व्यवस्था आहे, अथवा नाही याची खातरजमा करणे संस्थेच्याप्रमुखांची जबाबदारी असून, त्याबाबत अडचण येत असेल तर प्रशासनाशी चर्चा करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, स्वच्छता गृहे आदी व्यवस्था तसेच मतदान केंद्राच्या मोडकळीस आलेल्या खिडक्या, दरवाजे दुरुस्त करुन घ्यावेत तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. ******

No comments: