08 November, 2024

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची आखाडा बाळापूर येथील अवैध तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही • 7 व्यक्तींकडून 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

हिंगोली (जिमाका), दि 08: राज्यामध्ये आरोग्य विभागामार्फत तंबाखू मुक्त युवा 2.0 हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक जनजागृती पर कार्यक्रम, तंबाखू मुक्त शाळा, तंबाखू मुक्त शासकीय कार्यालये तसेच अवैध तंबाखू विक्रीवर आळा घालण्यासाठी धाडसत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. नितिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक व जिल्हा पोलिस यांनी आखाडा बाळापूर येथील बस स्थानक, हिंगोली रोड, शेवाळा रोड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अवैध तंबाखू विक्रेत्यांवर, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन उल्लंघन करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या 7 व्यक्तींवर कोटपा कायदा-2003 नुसार विविध कलमाअंतर्गत दंडात्मक कार्यवाही करुन 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, बाळगणे आणि शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये यांच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गोटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवंते यांच्या सहकार्याने पोलीस हवालदार घोंगडे, पोलीस शिपाई पवार, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे मंगेश गायकवाड व जिल्हा रुग्णालयातर्फे कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने शुक्रवारी आखाडा बाळापूर परिसरातील ठिक-ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी, कलम 6 - 'अ' 18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई, कलम 6 'ब' शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवनास बंदी आहे. कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगाविषयी चेतावनी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी. *******

No comments: