05 November, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही,याची काळजी घ्यावी - निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव

• सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही पूर्णवेळ उपलब्ध-निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल • खर्चाच्या नोंदी दररोज अद्ययावत कराव्यात-निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान हिंगोली (जिमाका), दि 05 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणेने चांगले नियोजन केले आहे. निवडणूक भयमुक्त, पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खर्च निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान, पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ. राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उप जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यावेळी उपस्थित होते. श्रीमती वंदना राव म्हणाल्या की, सर्व बाबींची माहिती संबंधित पथक प्रमुख आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांनी दिली आहे. प्रत्येक मतदार संघात विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना (सुविधा कक्ष) कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक कालावधीत प्रचार करताना परवानगी घेऊनच प्रचार करावा. परवानगीशिवाय कोणताही प्रचार केल्यास व निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. यासाठी सर्व उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. निवडणुकीच्या सर्व बाबींवर निवडणूक आयोगाच्या एफएसटी, एसएसटी व व्हीएसटी पथकाद्वारे करडी नजर राहणार आहे. उमेदवारांना किंवा त्यांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेबाबत काही शंका असल्यास सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे भेटता येईल. आपल्या शंका, अडचणीचे निराकरण करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ. राकेशकुमार बन्सल म्हणाले की, सर्वांना कायदा समान आहे. हिंगोलीचा निवडणूक कालावधीतील इतिहास चांगला आहे. त्याला पुढे नेण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी काम करावे. कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होणार यासाठी नियमाच्या चौकटीत राहून प्रचार करा, यासाठी सर्वांना सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वजण योग्य समन्वयातून कामकाज पार पाडाल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही येथे पूर्णवेळ उपलब्ध असून, काही तक्रार असल्यास सी-व्हीजील ॲपवर तक्रार नोंदवावी. त्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी अभिरुप नोंदवही (शॅडो रजिस्टर) दररोज अद्यावत करावे. प्रत्येक उमेदवारास 40 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेतच खर्च होईल याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. 10 हजारापेक्षा जास्त रोखीचे व्यवहार होणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवडणूक प्रचार करताना सर्व परवानग्या घेऊनच प्रचार करावा. प्रचारासाठी झालेला खर्च दररोज अभिरुप नोंदवहीमध्ये अद्यावत करावा. सर्व विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त सहायक खर्च निरीक्षकांनी आपापल्या मतदार संघातील खर्चांच्या नोंदी अचूक तपासून ती दररोज अद्यावत करावी. उमेदवाराला काही अडचणी आल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सोडवता येतील. तसेच आपली काही तक्रार असेल तर लेखी स्वरुपात किंवा सी-व्हीजील ॲपवर द्यावी. निवडणूक आयोगामार्फत एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी पथकामार्फत रोकड, मद्य आदी वाटपावर बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खर्चाचे निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी दिले. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांनी पालन करताना, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत असलेला तपशील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर निवडणूक कालावधीत 3 वेळा प्रकाशित करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी दिल्या. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक आचारसंहिता पथकाचे प्रमुख नामदेव केंद्रे, खर्चाचे पथक प्रमुख दिगंबर माडे, परवाना कक्षाचे प्रथम प्रमुख प्रशांत बिलोलीकर यांनी आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चाच्या बाबी, विविध परवाने याची माहिती उमेदवारांना सांगितली. या बैठकीस सर्व जिल्हास्तरीय पथक प्रमुख, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक खर्च निरीक्षक, सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

No comments: