18 November, 2024

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य पथक होणार दाखल

• आरोग्य यंत्रणा सतर्क : तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील बूथवर दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. हिवाळा ऋतू असूनही वातावरणातील बदलाची दखल घेत मतदान बूथवरील सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार किटसह आशा वर्कर उपस्थित राहणार आहेत. यांची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तसेच तातडीच्या उपचारासाठी व संदर्भ सेवेसाठी 102 व 108 रुग्णवाहिका जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध राहणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतदान पूर्ण होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. ******

No comments: