13 November, 2024

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदाराना 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 13 : विधानसभा निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता की स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणसाठी नोडल अधिकारी टि. ई. कराड सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली (मो.नं. 7218161627) यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: