21 November, 2024
हिंगोली जिल्ह्यात 72 टक्के मतदान
• वसमत विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान
• हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक
• पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी
• तृतीयपंथीयाचे 50 टक्केच मतदान
हिंगोली (जिमाका), दि.21: हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 72.24 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 75.05, कळमनुरी 73.63 आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात 68.16 टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, खर्च निरीक्षक श्री. अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. राकेशकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली.
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 40 हजार 737 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 26 हजार 818 पुरुष, 1 लाख 13 हजार 917 महिला तर 2 तृतीयपंथी मतदाराने मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 43 हजार 490 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 28 हजार 771 पुरुष, तर 1 लाख 14 हजार 718 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 2 लाख 27 हजार 202 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 19 हजार 750 पुरुष, 1 लाख 7 हजार 450 महिला आणि 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 92-वसमत विधानसभा मतदार संघ (75.05 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (68.16 टक्के) सर्वात कमी राहिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख तसेच जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment