14 November, 2024

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

• विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा • सर्वांनी योग्य समन्वयातून जबाबदारी पार पाडा • मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना हिंगोली, (जिमाका) दि. 14 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वकपणे काम करावे. जिल्ह्यात येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांच्यासह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची कमी टक्केवारी पाहता बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत त्यात वाढ करण्याबाबतच्या सूचना देताना, मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी जास्त वेळ वाट पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांना काही मोजक्या मतदारांना एकत्र मतदान केंद्रांमध्ये पाठविण्याबाबतची सुविधा देता येईल, यादृष्टीने नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकामी मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करताना आवश्यक मनुष्यबळासह यावे. डिस्पँच सेंटर, रिसिप्ट, ट्रेनिंग आणि स्ट्रॉंगरूमची तयारी झाल्याबाबत माहितीही त्यांनी जाणून घेतली. स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. मतदानाच्या दिवशी व्होटर टर्नआऊट अँपवर मतदानाच्या टक्केवारीची तात्काळ माहिती भरावी, त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिले. तसेच आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, प्रसारमाध्यमांमध्ये पेड न्यूज येणार नाहीत, याबाबतची खबरदारी घेण्यासोबतच समाजमाध्यमांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. निवडणूक प्रचारात, तसेच मतदानाचा जाहीर प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी, तसेच मद्य, पैसे याचे वाटप होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांच्या माध्यमातून मोहीम स्वरुपात तपासणी करून आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त यांनी केल्या. मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नवमतदार तसेच महिला यांच्यामध्ये जागृती करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. लोकसभेतील राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अशा मतदान केंद्रावर विशेष पथके नेमून मतदार जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरजिल्हा तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. यासोबतच पोलीस दलामार्फत अचानक तपासणी मोहीम राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच अवैध मद्यसाठे, पैसा जप्त करण्यासाठीही शोध मोहीम राबविण्यात आली आहे. पिस्तुलसह विविध शस्त्रे तपासणी मोहिमेमध्ये जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच मतदान कक्ष, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पथक प्रमुखांनी त्यांच्या कामकाजाबाबतची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. *****

No comments: