11 November, 2024

दोन दिवसात 989 मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान

हिंगोली (जिमाका), दि 11: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी लोकशाहीचा लोकोत्सव सुरू आहे. निवडणूक आयोग एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी गृहभेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहे. दोन दिवसात निवडणूक यंत्रणेने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांच्या दारी पोहचून 989 मतदारांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील असून, त्यासाठी जिल्ह्यात निवडणूक विभागाची पथके गठित करण्यात आली आहेत. ही पथके घरोघरी जावून ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे मतदान करून घेत आहेत. जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे तिन्ही मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत जातीने लक्ष घालत आहेत. त्यांच्या सोबतीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, टपाली मतदानाचे जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे हे त्याकामी आपापली कर्तव्ये पार पाडत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांचे 888, दिव्यांग 157 आणि अत्यावश्यक सेवेतील 25असे एकूण 1 हजार 70 मतदार असून, पहिल्या दिवशी गृहभेटी मतदान अभियानाद्वारे 700 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी तर दुसऱ्या दिवशी 289 अशा एकूण 989 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगितले आहे. सर्व विधानसभानिहाय टपाली आणि गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील 835ज्येष्ठ आणि 154 दिव्यांग असे एकूण 989 मतदारांनी गेल्या दोन दिवसात मतदानाचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यावेळी घरबसल्या मतदान करता येत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून आला तर निवडणूक आयोगाच्या गृहभेटी मतदान अभियानाचे कौतुक केले. *****

No comments: