22 November, 2024

जिल्ह्यात सोमवारपासून पशुगणना; पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी -पशुसंवर्धन उपायुक्त

हिंगोली, (जिमाका) दि. २२: २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस सोमवार (दि.२५)पासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदि प्रजातीच्या जाती, लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर पशुगणना दि.२५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ असे एकूण ८३ पशुगणनेसाठी प्रगणक, तर ग्रामीण भागाकरिता २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकाव्दारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची माहिती प्रगणकांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. *****

No comments: