05 November, 2024

हिंगोली जिल्हा विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशीनची पुरवणी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यात निवडणूक नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वसमत वगळता इतर दोन मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट लागणार असल्यामुळे आज निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत पुरवणी सरमिसळ प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर पूर्ण करण्यात आली. या तिन्ही मतदार संघात यातून कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी 11, 93-कळमनुरी मतदार संघासाठी 19 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात निश्चित झाले आहेत. कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक मतदार केंद्रावर 2 बॅलेट युनिट लागणार आहेत. तसेच वसमत विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिट लागणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात 7 अशा एकूण 8 सहाय्यकारी मतदान केंद्रासाठी अतिरिक्त बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट हे मतदान यंत्र वितरीत करण्यासाठी निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत पुरवणी सरमिसळ प्रक्रिया आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर पूर्ण करण्यात आली. या तिन्ही मतदार संघात यातून कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाना वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर पूर्ण करण्यात आली होती. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्सची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे 20 व 30 टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी 96 बॅलेट युनिट, 03 कंट्रोल युनिट व 04 व्हीव्हीपॅट यंत्र अतिरिक्त उपलब्ध करण्यात आले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी 470 बॅलेट युनिट, 14 कंट्रोल युनिट व 14 व्हीव्हीपॅट यंत्र अतिरिक्त उपलब्ध करण्यात आले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 470 बॅलेट युनिट, 4 कंट्रोल युनिट व 4 व्हीव्हीपॅट यंत्र अतिरिक्त उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करताना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली. *******

No comments: