18 November, 2024
विधानसभा निवडणूक 2024 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद
• अवैध मद्य विक्रीची तक्रार टोल फ्री क्रमांक व दूरध्वनी क्रमांकावर देण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी (दि.२०) मतदान होत असून, त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार तसेच निवडणूक आयोगाच्या विविध निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यत 18 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोव्हेबर 2024 पर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण दिवस मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क हिंगोली कार्यालयाच्या 02456-220106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment