19 November, 2024

लोकशाहीच्या महोत्सवासाठी .... चला करू मतदान -जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

• आज दिवस तुमचा; मतदानाचा हक्क बजावण्याचा • मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज • गृहभेटीतून 989 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क • ज्येष्ठ व दिव्यांगांनी सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करून ने-आण सुविधेचा लाभ घ्यावा हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी केली आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी कोणतेही कारण न देता मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभाग गृहभेटी घेत निवडणूक विभाग मतदारांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचत 835 ज्येष्ठ व 154 दिव्यांग असे एकूण 989 मतदारांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. निवडणूक विभागाने निवडणूक पथकांनाच मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या सोहळ्यात आपल्या मतांचे दान केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 328 मतदान केंद्र असून त्यापैकी किन्होळा-185 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. तर 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात 352 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 मतदार केंद्र असून या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने उद्या बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ******

No comments: