19 November, 2024
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल
• हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील पथके मतदान केंद्राकडे रवाना
• ‘है तय्यार हम’ निवडणूक कामी नियुक्त पथकांची भावना
हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची मतदानासाठी जय्यत तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, दि. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील पथके आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली आहेत.
वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते आणि हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नियंत्रणाखाली ही पथके आज सकाळपासून रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘है तय्यार हम’ची भावना व्यक्त केली.
92-वसमत विधानसभा मतदार संघ
92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 1702 मतदान अधिकारी, 656 पोलिस कर्मचारी व होमगार्ड, 328 शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्तरावरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात येणार आहे. समन्वय करण्यासाठी 38 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या 18 पथकामार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. सशस्त्र सेना बलाचे 90 जवान मतदार संघात गस्तीवर असतील.
सर्वांनी निर्भयपणे व न चुकता मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेऊन त्यांना मतदान यंत्र व मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य देऊन 352 मतदान केंद्रावर 36 क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथके रवाना करण्यात आली.
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 352 मतदान केंद्राध्यक्ष, 1056 मतदान अधिकारी, 95 महिला कर्मचारी, 704 पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण 2207 अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहेत.
या कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या सहाकार्याने मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पाठविण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे.
94-हिंगोली विधानसभा मतदार संघ
94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 343 मतदान केंद्रांवर 1524 अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी 35 मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सर्व पथके हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केद्रांकडे रवाना करण्यात आली आहेत. त्यासाठी 25 बस, 6 मिनीबस, 108 जीप व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय करण्यासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment